Corona
Corona 
राज्य

तपासणी करण्याआधीच पिता-पुत्राने ठोकली रुग्णालयातून धूम

सरकारनामा ब्युरो

नेवासे : कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आल्याने, नेवासे बुद्रुक येथील पिता-पुत्र तपासणीसाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. मात्र, आज सकाळी घशातील स्राव देण्यापूर्वीच या पिता-पुत्राने जिल्हा रुग्णालयातून पळ काढला. वडील घरी आल्याने हा प्रकार उघड झाला. मात्र, त्यांच्या मनोरुग्ण मुलाचा रात्री उशिरापर्यंत ठावठिकाणा लागला नव्हता. त्यामुळे तालुका प्रशासनही चक्रावले आहे. 

कल्याण येथून नेवासे बुद्रुक येथील मुलीला भेटायला आलेली 60 वर्षीय महिला कोरोनाबाधित निघाली. तिच्या संपर्कात आलेल्या सात जणांना तालुका प्रशासनाने रविवारी (ता. 24) सायंकाळी नगर येथे जिल्हा रुग्णालयात हलविले. त्यात बाधित महिलेचा नेवासे बुद्रुक येथील जावई व मनोरुग्ण नातवाचा समावेश होता. मात्र, आज सकाळी घशातील स्राव-नमुने न देताच या पिता-पुत्रांनी जिल्हा रुग्णालयातून पलायन केले. वडील थेट गावात आल्याने हा प्रकार समोर आला. 

दरम्यान, तालुका प्रशासनाने 55 वर्षीय पित्याला ताब्यात घेऊन नेवासे फाटा परिसरातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील विलगीकरण कक्षात दाखल केले. मात्र, मनोरुग्ण असलेल्या त्यांच्या 25 वर्षीय मुलाचा रात्री उशिरापर्यंत ठावठिकाणा लागला नव्हता. गायब मुलगा कोणाकोणाच्या संपर्कात येतो, या विचाराने प्रशासन चक्रावले आहे. 

दरम्यान, रविवारी सात जणांना जिल्हा रुग्णालयात घेऊन निघताना, या मुलाने सर्वांची नजर चुकवून पलायन केले होते. मात्र, पोलिसांनी त्याला जवळील स्मशानभूमीत पाठलाग करून पकडले. त्यानंतर त्याने आज पित्यासह जिल्हा रुग्णालयातून पलायन केल्याने भोंगळ कारभार समोर आला आहे. 

मुलगा अजूनही सापडेना

नेवासे बुद्रुक येथील पिता-पुत्रांना रविवारी घशातील स्राव-नमुने घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, नमुने न देताच आज त्यांनी रुग्णालयातून पळ काढला. घरी आलेल्या वडिलांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. मात्र, त्यांचा मुलगा अजून सापडलेला नाही. इतर पाच जणांचे स्राव-नमुने घेतले आहेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT