sangamner.png
sangamner.png 
राज्य

वडील सरपंच.. मुलगा शिपाई! मनोली ग्रामपंचायतीत अनोखा योगायोग

आनंद गायकवाड

संगमनेर : आजोबा, वडील नि मुलगा, अशा तीन पिढ्यांनी ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून गावाची प्रामाणिकपणे सेवा केली. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर मुलानेही तीन पिढ्यांची परंपरा जोपासली. मात्र, जेथे कचरा काढला, तेथेच सरपंच म्हणून विराजमान होण्याचा मान मनोली येथील अशोक पराड यांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, पराड यांचा मुलगा त्याच ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून असणार आहे. 

तालुक्‍याच्या पूर्व भागातील मनोली हे छोटेखानी गाव. अशोक पराड हे अत्यल्प भूधारक. मोलमजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या कुटुंबातील भागाजी पराड यांनी सुमारे 40 वर्षे ग्रामपंचायतीचे शिपाई म्हणून कर्तव्य बजावले. त्यांच्या निवृत्तीनंतर, दहावीपर्यंत शिक्षण झालेले त्यांचे चिरंजीव अशोक पराड यांनी शिपाई म्हणून 27 वर्षे सेवा केली. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा शैलेश सध्या ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून काम पाहत आहे. दैवाचा खेळ विचित्र असतो.

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अशोक पराड यांनी राजकीय पटलावर आपल्या दैवाचे फासे टाकले. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मनोली येथे आमदार राधाकृष्ण विखे पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटांत लढत झाली. त्यात 9 पैकी 7 जागांवर विखे गटाच्या जनसेवा पॅनलने बाजी मारली. काल (बुधवारी) सरपंचपदासाठीचे आरक्षण जाहीर झाले. त्यात मनोलीचे सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव निघाले आणि या जागेवर गावातील प्रभाग 4 मधून पराड हे एकमेव उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यामुळे सरपंचपदी त्यांची निवड निश्‍चित आहे.

शिपाई म्हणून पिढ्यान्‌ पिढ्या राबलेल्या पराड कुटुंबाला सरपंचपदाचा मान मिळाला. त्यामुळे मनोलीत वडील सरपंच तर मुलगा शिपाई, असे अनोखे दृश्‍य दिसणार आहे. शिपाई ते सरपंच या प्रवासात गावाची खडान्‌ खडा माहिती व कारभाराची जाणीव असल्याने, पराड यांच्या प्रामाणिक कष्टाचे यानिमित्ताने चीज झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. दरम्यान, महाराष्ट्रात ही अफलातून घटना आहे.

सर्वांच्या सहकार्याने कारभार करणार

मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता, सर्वांच्या सहकार्याने कारभार करणार आहे. राज्य व केंद्र सरकारच्या गावासाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी व गावातील सर्व घटकांसाठी घरकुल योजना व पायाभूत सुविधांची व्यवस्था करण्याला प्राधान्य राहील. 

- अशोक पराड, सरपंचपदाचे उमेदवार, मनोली 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT