Mulak-Vikas Thakre- Raut - Kedar.
Mulak-Vikas Thakre- Raut - Kedar. 
राज्य

मुलांच्या भविष्यासाठी मदभेद विसरून एकत्र आले कॉंग्रेसचे नेते...

राजेश चरपे

नागपूर : कॉंग्रेसचे नागपुरातील नेते एकाच व्यासपीठावर बरेचदा दिसत नाहीत. कारण त्यांच्यातील मतभेद इतके टोकाला गेले आहेत की, त्यांच्या एकवाक्यता कमी आणि संघर्षच जास्त बघायला मिळतो. पण आपल्या मुलांना राजकारणात आणण्यासाठी हे नेते एकत्र आल्याचे युवक कॉंग्रेसच्या मोर्चात सोमवारी बघायला मिळाले. मुलांना एंट्री देताना घराणेशाहीचा ठपका ठेवला जाऊ नये, याची काळची मात्र या नेत्यांना घ्यावी लागणार आहे. 

वडिलांकडून राजकारणाचे बाळकडू घेऊन शहरातील अनेक आमदारांचे पुत्र आगामी महापालिकेच्या निवडणुकीतून आपल्या राजकीय कारर्कीदीचा श्रीगणेशा करण्याच्या प्रयत्नात आहेत. यात कुणाल राऊत, केतन ठाकरे, रोहित खोपडे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. राज्याचे ऊर्जामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल युवक काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. सध्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत. शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे हेसुद्धा युवक काँग्रेसमध्ये यापूर्वीच दाखल झाले आहेत. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांचे पुत्र रोहित यांचा भाजयुमोच्या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे. 

विशेष म्हणजे आमदारांचे हे पुत्र राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत. कुणाल राऊत यांच्या नेतृत्वातच सोमवारी महागाई, इंधन दरवाढ, रोजगाराकरिता आंदोलन करण्यात आले होते. यात आपसातील मतभेद विसरून सर्वच नेते सहभागी झाले होते. यात नितीन राऊत यांच्यासह पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांचा समावेश होता. एरवी ही नेते मंडळी एका पक्षात जरी असली तरी एका व्यासपीठावर फारसे दिसत नाही. विकास ठाकरे यांचे पुत्र केतन यांनी तर महापालिकेसाठी मोर्चे बांधणीसुद्धा सुरू केली आहे. वडिलांच्या प्रभागात ते दावा करणार असल्याचे समजते. युवा कार्यकर्त्यांची फळीसुद्धा त्यांनी तयार केली आहे. रोहित खोपडे यांचा आता कार्यकारिणीत समावेश झाला असला तरी ते आधीपासूनच राजकारणात सक्रिय आहेत. आता फक्त घराणेशाहीचा वाद उफाळून येऊ नये याची दक्षता या नेत्यांना घ्यावी लागणार आहे. 

वडिलांच्या पावलावर पाऊल 
पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, आमदार अभिजित वंजारी, भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, माजी महापौर संदीप जोशी, आमदार दुष्यंत चतुर्वेदी हे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात दाखल झाले आहेत. ते सर्वच यशस्वी राजकारणी म्हणून ओळखले जातात. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झालेत. केदार मंत्री आहेत. मुळक यापूर्वी अर्थ व ऊर्जा राज्यमंत्री होते.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT