shrirampur.jpg
shrirampur.jpg 
राज्य

आरोपींना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार थांबविणार ! दुसऱ्या दिवशीही बेलापूर बंदच

गाैरव साळुंके

श्रीरामपूर : बेलापूर येथील अपहरण झालेले व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचा मृतदेह काल सकाळी वाकडी रस्त्यावरील रेल्वेमार्गासमोरील यशवंतबाबा चौकी परिसरात आढळला. बेलापूर बाह्यवळण परिसरातून एक मार्च रोजी त्यांचे अपहरण झाले होते. पोलिस तपास सुरू असताना, काल सातव्या दिवशी कुजलेल्या अवस्थेतील त्यांचा मृतदेह सापडला.

दरम्यान, आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ देणार नाही, अशी भूमिका संबंधित कुटुंबियांनी घेतली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आजही बेलापूर बंद ठेवण्यात आले आहे. तसेच आरोपीला अटकेसाठी संबंधित कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास असमर्थता दर्शविल्याचे भाजपचे कार्यकर्ते सुनील मुथ्था यांनी सांगितले.

श्रीरामपूर- वाकडी रस्त्यालगत यशवंतबाबा चौकी परिसरात काही प्रवाशांना काल सकाळी मृतदेह दिसला. याबाबत माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटत नव्हती. हिरण कुटुंबीय घटनास्थळी गेल्यानंतर कपडे, खिशातील कागदपत्रांवरून ओळख पटली. 

बेलापूर बाह्यवळणासमोरून एक मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हिरण यांचे अपहरण झाले होते. याबाबत शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, बेलापूर खुर्द व बुद्रुक येथे काल (शनिवारी) "बंद' पाळण्यात आला. बेलापूर ग्रामस्थांनी बैठक घेत, हिरण यांची माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. 

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार लहू कानडे यांनीही राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. व्यापारी हिरण यांच्या शोधार्थ विशेष तपास पथके रवाना झाली होती. त्यानंतर काल सकाळी कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह औरंगाबादला हलविला. 

व्यापारी हिरण यांच्या मारेकऱ्यांना तातडीने गजाआड करण्याची मागणी बेलापूर ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ श्रीरामपूरसह बेलापुरातील व्यापाऱ्यांनी काल बाजारपेठ बंद ठेवून हिरण यांचा श्रद्धांजली वाहिली. 

पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून, संबंधित आरोपींना लवकरच अटक करू. व्यापारी वर्गाने घाबरण्याचे कारण नाही. सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT