Dr.kiran-lahamte-27-ff.jpg
Dr.kiran-lahamte-27-ff.jpg 
राज्य

आमदार लहामटे यांच्याकडून घुमजाव, आता सरपंचांना जिल्हाधिकाऱ्यांकडून `फूल` अधिकार

सरकारनामा ब्युरो

नगर : अकोले तालु्क्यातील सरपंचांवर कारवाई करण्याबाबतच्या वक्तव्याबाबत आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी आता घुमजाव केले आहे. कोरोनाविषयक जबाबदारी पार पाडताना काही लोकांकडून राजकारण झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊन नये म्हणून आपण भूमिका मांडली होती, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सरपंचांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेवून तक्रारी केल्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंचांना सर्व अधिकार असल्याचे सांगून कोरोनाच्या कामात सक्रीय होण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोनाविषयक कामे करताना हालगर्जीपणा केल्याबाबत सरपंचांवर कारवाई करण्याबाबत आमदार लहामटे व तहसीलदार यांच्यात झालेल्या संभाषणाची ध्वनीफित व्हायरल झाली होती. त्यामुळे अकोले तालुक्यातील सर्व सरपंच चिडले. त्यांनी एकत्र येत आमदारांच्या विरोधात पवित्रा घेवून कारवाईची भाषा करीत असाल, तर आम्हाला कोरोनाच्या कामातून मुक्त करावे, अशी भूमिका घेतली होती. काल माजी आमदार वैभव पिचड यांनी तालुक्‍यातील 30 सरपंचांसह जाऊन थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

लोकांनी निवडून दिलेल्या सरपंचांची पदे घालविण्याचा अधिकारी तहसीलदार व आमदारांना नाही. अशा पद्धतीने ते भाषा करीत असतील तर आम्ही काम कसे करायचे. आम्हाला काय अधिकार आहेत, ते सांगा. चांगले काम करूनही आमची पदे घालविण्याची व कारवाईची भाषा असेल, तर आम्ही काय करायचे? अन्यथा आमदार व तहसीलदारांना गाव सांभाळायला सांगा, असा पवित्रा सरपंचांनी घेतला होता.

दरम्यान, गावसमिती व सरपंचांना सर्व अधिकार आहेत. यापुढे तुम्ही काम करा. आपत्तीव्यवस्थापनासाठी प्रत्येक तालुक्याला दोन लाखांचा निधी दिला असून, सरपंचांनी आपापली कामे व्यवस्थित करावीत. कोरोनाविषयक कामांमध्ये स्वतःला झोकून द्यावे, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आमदार लहामटे यांनी घुमजाव केला असून, माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की आदिवासी भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, हाच आपला उद्देश आहे. राजूर ही मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे आदिवासी नागिरकांनी दुकाने सुरू असावीत, अशी माझी भूमिका आहे. मात्र काही लोकांकडून त्यामध्ये राजकारण केले जात असल्याने ग्रामपंचायतींनी सरकारी आदेशाचे पालन करावे, असे आपले म्हणणे आहे. नागरिकांना कळावे, म्हणून आपणच ती क्लिप व्हायरल केली असून, त्यामध्ये राजूरच्या सरपंचांना समज द्या, असे मी म्हटलो आहे. कारवाईची भाषा आपण वापरली नाही. याबाबत मी जास्त राजकारण करणार नाही, असे आमदार डाॅ. लहामटे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT