राज्य

गोटे यांनी इतरांना गुंड म्हणावे हेच हास्यास्पद - गिरीश महाजन

सरकारनामा ब्युरो

धुळे : " मी भाजपमध्ये आहे, माझ्यावर पक्षांतर्गत कुठलीही कारवाई झालेली नाही', असे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले. मात्र, धुळे महापालिका निवडणुकीत रोज मुक्ताफळे उधळणारे आमदार अनिल गोटे यांच्याशी आमचा, भाजपचा काहीही संबंध उरलेला नाही, अशी सडेतोड भूमिका जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत मांडली. त्यामुळे भाजपची आमदार गोटेंशी फारकत झाली आहे. धुळे महापालिका निवडणुकीचे पक्षीय प्रभारी जलसंपदामंत्री महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपची भूमिका मांडण्यात आली, 
गोटेंशी संबंध नाही 
मंत्री महाजन म्हणाले, की आमदार गोटे यांनी या निवडणुकीत "लोकसंग्राम'च्या माध्यमातून वेगळे पॅनल दिले आहे. त्यामुळे आमदारांचा भाजपशी काही संबंध नाही. ते आणि शिवसेना, इतर कुणीही असो एकमेकांना पाठिंबा देत आहेत. निवडणुकीत पराभव दिसू लागताच, पायाखालची वाळू घसरू लागताच पाठिंब्यासारखे केविलवाणे प्रयोग त्यांना करावे लागत आहेत. भाजपच्या विरोधात सर्व एकत्र ही गोष्ट नवीन राहिलेली नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत विकासाचे लक्ष्य साध्य करणाऱ्या भाजपला विरोध होणे स्वाभाविक आहे. 
विकास महत्त्वाचा 
कमरेखालच्या भाषेतून शहराचा विकास होऊ शकत नाही, असे सांगत मंत्री महाजन म्हणाले, की भाजपला कुणावर आरोप- प्रत्यारोपही करायचा नाही. आमदार गोटे हे वारंवार भाजपमध्ये गुंड, असा अपप्रचार करीत आहेत. कोणी कुणाला गुंड म्हणावे ? त्यात आमदार गोटे यांनी इतरांना गुंड म्हणावे त्याचेच हसू येते. त्यांना कुठलाही अधिकार राहिलेला नाही. मतदार ठरवतील कुठले पार्सल कुठे पाठवायचे ते. आमदार गोटे यांनी बंडखोरी करत वेगळे पॅनल निवडणुकीत दिले आहे. त्यांच्यावर पक्ष शिस्तीबाबत कारवाई करण्याचा अधिकार प्रदेश पातळीवर आहे. त्यातील नेते योग्य तो निर्णय घेतील. तसेच महापालिकेत नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांना ठेकेदार होऊ देणार नाही. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माझ्या खात्यावर केलेले आरोप तथ्यहीन आहेत. आम्ही त्यांच्या सत्ता कालावधीप्रमाणे अधिक प्रमाणात नव्हे तर 92 टक्‍क्‍यांपेक्षा कमी दराने निविदा मंजूर करून पारदर्शकता ठेवली असल्याचेही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT