औरंगाबाद : लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी औरंगाबादमध्ये जागा आणि निधी देऊन देखील सरकार हेतुपूरस्पर टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन डोईफोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. गोपीनाथ मुंडे यांचे शहरात भव्य स्मारक व्हावे आणि त्यातून तरूणांनी प्रेरणा घ्यावी या हेतून तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शहरातील शासकीय दुध डेअरीची जागा दिली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्या समक्ष स्मारकाची जागा निश्चित करून निधीसाठीचा प्रस्तावही शासनाकडे पाठवला होता.
मंत्रिमंडळ बैठकीत देखील या प्रस्तावाला मान्यता देऊन निधी देखील देण्यात आला. परंतु त्यानंतर मात्र स्मारकाचे काम रखडले असा आरोप जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन डोईफोडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केला आहे. खेड्यापाड्यात, तांडे, वस्तीवर भाजप पोहचवण्यात गोपीनाथ मुंडे यांचा सिहांचा वाटा होता. राज्याला कार्यशील आणि गतीशील करण्यात त्यांचे योगदान आहे. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री असतांना गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी केलेले काम कधीही विसरता येणार नाही. तरूण पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूने मुंडे यांचे स्मारक उभारण्याची संकल्पना पुढे आली होती. परंतु केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला खऱ्या अर्थाने सोनेरी दिवस दाखवणाऱ्या गोपीनाथ मुंडेची याच सरकारकडून अवहेलना केली जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
गोपीनाथ मुंडेच्या स्मारकास होणाऱ्या विलंबाच्या विरोधात यापुर्वी जय भगवान महासंघाच्या वतीने वेळोवेळी रास्तारोको, निदर्शने, आंदोलने करण्यात आली. प्रशासनाला निवेदन देऊन स्मारक उभारण्याची मागणी करून देखील त्याची दखल घेतली गेली नाही. या दिरंगाईच्या निषेधार्थ व स्मारकाच्या मागणीसाठी आज (ता, 29) सकाळी साडेअकरा वाजता डोईफोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. आपल्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.