MLA Nilam Gorhe
MLA Nilam Gorhe 
राज्य

आरोग्य सेविकेस मारहाणप्रकरणी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे आक्रमक

सरकारनामा ब्यूरो

जत : येळवी (ता. जत) येथील आरोग्य सेविकेस चाबकाने मारहाण झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या माजी उपसभापती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे पत्राद्वारे विविध मागण्या केल्या आहेत. 

या मारहाणीसाठी नेमलेले तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक कांबळे यांच्याकडून तपास काढून घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.  डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिस महासंचालक यांना निवेदनात लिहिले की सांगली जिल्ह्यातील येळवी तालुका जत येथे दि 24 जुलै 2020 रोजी श्रीमती सुरेखा  विभूते या आरोग्यसेविका या कोरोनाचा रुग्णासंदर्भात माहिती घेण्यासाठी गेल्या होत्या.

तेथे धनाजी घोंगडे व बाळू घोंगडे (रा. येळवी, ता. जत) या दोघांनी संबंधित आरोग्य सेविका यांना ग्रामपंचायतीसमोर बोलवून चाबकाने मारहाण केली.  सदर आरोग्य सेविका या कोविडचे कामकाज करत असतानाही त्यांना शासकीय कामकाजापासून दूर ठेवण्यात आले. वरील दोन्ही व्यक्तींवर जत पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद होऊन अटक झाली आहे. पण या गुन्हेगारांना न्यायालय कोठडी मिळालेली आहे.

त्यामुळे संबंधित चौकशी अधिकारी यांच्याबाबत संशय निर्माण झाला आहे. संबंधित चौकशी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक श्री. कांबळे तात्काळ बदलावा. चौकशी अधिकारी म्हणून महिला अधिकारी यांना नेमावे. या गावांमध्ये सीसीटीव्ही लावलेले आहेत ते सीसीटीव्ही तात्काळ ताब्यात घ्यावे. त्यामध्ये हा गुन्हा नोंद झालेला आहे. 

या गुन्हेगारांना पोलिस कोठडी मिळण्यासाठी व कठोर शिक्षा होण्याचे अनुषंगाने आवश्यक ते सर्व पुरावे तात्काळ जमा करण्याच्या सूचना चौकशी अधिकाऱ्यांना द्याव्यात. गुन्हेगारांनी वापरलेले चाबूक व मोटरसायकल पोलिस स्टेशनमध्ये जमा केले आहे. ते सीसीटीव्ही फुटेज तपासकामी वापरण्यात यावे.

तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये  कलमे लावावीत. आपण केलेल्या कार्यवाहीबाबत मला तात्काळ कळविण्यात यावे, असे म्हटले आहे. याप्रकरणात शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लक्ष घातल्यामुळे आता तपासाला अधिक गती येईल, अशी आशा आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT