Anil Deshmukh
Anil Deshmukh  
राज्य

गृहमंत्र्यांनी ठरवले, भूमाफियांचा बिमोड करणारच, सोमवारी ५० तक्रारींचा निपटारा करणार !

अनिल कांबळे

नागपूर : उपराजधानीत भूमाफियांचा आतंक झालेला आहे. लोकांची घरे व जमिनी हातोहात हडपून भूमाफिया गब्बर झाले आहेत. सामान्य लोक यामुळे त्रस्त झालेले आहेत. आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भूमाफियांचा बिमोड करण्याचे ठरवले. भूमाफियांच्या विरोधात तक्रारी करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ३०० च्या वर तक्रारी प्राप्त झाल्या असून सोमवारी ५० तक्रारींचा निपटारा स्वतः गृहमंत्री करणार आहेत. 

शहरातील भूमाफियांच्या विरोधात गृहमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भूखंडांच्या खरेदी-विक्रीत झालेल्या फसवणूकीसंदर्भात तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. त्यापैकी ५० तक्रारींचा निपटारा सोमवारी पोलिस जिमखाना येथे खुद्द गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह संबंधित पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संकल्पनेतून गेल्या २० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान रवीभवनातील शिबीर कार्यालयात गुंड व भूमाफीयांच्या विरोधात तकार करण्यासाठी विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला होता. यात नागरिकांनी तक्रारी करण्याचे आवाहन गृहमंत्री देशमुख यांनी केले होते. या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. या काळात ३०० पेक्षा अधिक तकारी प्राप्त झाल्या. यापैकी पहिल्या ५० तक्रारींवर सुनावणी येत्या सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सिव्हील लाईनमधील पोलिस जिमखाना कार्यालयात होणार आहेत. गृहविभागातर्फे तकारकर्त्यांना सूचना देण्यात येणार आहेत. गृहविभागाकडून सूचना मिळालेल्या तकारकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारदारांची सुनावणी पुढील टप्प्यात होणार आहे. 

तक्रारकर्त्यांना बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, या तक्रारीवर संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई व्हावी, यासाठी पहिल्या ५० तक्रारदारांना बोलविण्यात येणार आहे. तक्रार निवारण कक्षाला मिळालेल्या सर्व तक्रारींची सुनावणी टप्याटप्प्याने होणार आहे. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह संबंधित परिमंडळाचे पोलीस उपायुक्त उपस्थित राहणार आहेत. या सुनावणीसाठी संबंधित निबंधक रजिस्ट्रार यांनाही हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. गुंड व भूमाफीयांच्या दहशतीमुळे शहरातील सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यावर आळा घालण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही संकल्पना मांडली होती. त्यानुसार आता पोलिस थेट कारवाईंला सुरवात करणार आहेत.

(Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT