सोनई : राज्य शासनाच्या परवानगी नंतर काल पाडव्याच्या दिवशी पहाटे साडेचारच्या आरती सोहळ्यानंतर स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन खुले करण्यात आले. दिवसभरात साडेतीन हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. आज दिवसभरही भाविकांनी गर्दी केली. दरम्यान, चौथऱ्यापर्य़ंत पूजा साहित्याला बंदी असतानाही भाविकांच्या हातात पुजेचे ताट दिसत होते.
पाडव्याच्या दिवशी पहाटे साडेचार वाजता 'सुर्यपुत्र शनिदेव की जय'च्या जयघोषात महंत त्रिंबक महाराज यांच्या हस्ते आरती सोहळा झाला. मुख्य पुजारी अशोक कुलकर्णी यांनी पौरहित्य केले. या वेळी मोजकेच ग्रामस्थ उपस्थित होते. आरती सोहळ्यानंतर महाद्वार समोरील संरक्षण कठडे काढून भाविकांना प्रवेश देण्यात आला.
मंदिर बंद झाल्यापासून येथील व्यावसाय बंदच असल्याने काल पहिल्या दिवशी दहा टक्केच दुकाने उघडले. मंदिर प्रशासनाने महाद्वारात हात-पाय धुण्याची व्यवस्था केली. चौथ-यापर्यंत पुजा साहित्याला बंदी असतानाही भाविकांच्या हातात पुजेचे ताट दिसत होते. सायंकाळी झालेल्या आरतीला सुरक्षित अंतर ठेवून शंभर भाविक उपस्थित होते. सर्वांनी चौथऱ्या खालुनच दर्शन घेतले.
इ-पासचीही सुविधा
शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने इ-पासची व्यवस्था करण्यात आली असून, बाहेरचे भाविक शनिदेव डाॅट काॅम या वेबसाईटवर पास काढू शकतात. गावात वाहनतळातील भक्तनिवास नोंदणी कार्यालयात पासची व्यवस्था करण्यात आली आहे, असे शनैश्वर देवस्थानचे तांत्रिक अधिकारी नितीन शेटे यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून हवी नियमावली
दरम्यान, जिल्हाभरातील मंदिरे काल खुले करण्यात आले. भाविकांची मांदियाळी सुरू झाली असली, तरी देवस्थान प्रशासनाला शासनाच्या विशेष मार्गदर्शक सूचना अद्याप जाहीर झाल्या नसल्याने केवळ कोविडच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे, सॅनिकायझरचा वापर, सामाजिक अंतर पाळणे या नियमांचे पालन करण्यात येत आहे. देवस्थान परिसर व गाभारा सॅनिटायझर करून घेणे किंवा हात लागेल तेथे सॅनिटायझरचा वापर करणे, देवस्थान परिसरात मास्क काढणाऱ्यांवर कारवाई आदींबाबतीत प्रशासनाकडून अद्याप नियमावली आली नसल्याने नेमका काय दक्षता घ्यायची, याबाबत लहान देवस्थाने मात्र अनभिज्ञ आहेत.
शनैश्वर देवस्थानाबरोबरच देवगड, मोहटा देवी, मढी आदी मोठी देवस्थाने आहेत. तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली जात असली, तरीही शासनाकडून नियमावली आल्यानंतर त्याची अंमलबजावणी अधिक चांगल्या पद्धतीने होईल, असे देवस्थानच्या प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ट्रस्टचे प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक सजग असून, नियमांची काटेकोर अंमलबजावणी करतील, असा विश्वास प्रशासनाकडून करण्यात आला.
Edited By - Murlidhar Karale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.