chakriwadal.jpg
chakriwadal.jpg 
राज्य

चक्रीवादळाने दिशा बदलली; नगर जिल्ह्याला दिलासा

सतीश वैजापूरकर

शिर्डी : बंगालच्या उपसागरात तयार झालेले आणि आंध्रच्या विशाखापट्टणम किनारपट्टीवरून अरबी समुद्राकडे निघालेले चक्रीवादळ कालपासून हैदराबादच्या थोडेसे दक्षिणेला सरकले. त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्यातून होणारा त्याचा संभाव्य प्रवास टळला आहे.

चक्रीवादळ काल (मंगळवारी) पहाटे विशाखापट्टण किनारपट्टीवरून हैदराबादमार्गे नांदेड, असा प्रवास करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ते हैदराबादच्या दक्षिणेला सरकले. त्याचा प्रवास महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाला; मात्र नांदेड टळल्याने ते दक्षिण नगर जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्‍यता कमी झाली. नांदेडऐवजी सोलापूर शहरापासून सुमारे एकशे साठ किलोमीटरवर कर्नाटकच्या सीमेवर आज पहाटे ते केंद्रित झाले होते.

दक्षिण नगर जिल्ह्याऐवजी उद्या (गुरुवारी) ते कर्नाटकातून जत व अक्कलकोट येथून महाराष्ट्रात प्रवेश करील. सायंकाळी सातारा व वडूज येथे पोचेल. सातारा व वडूज चक्रीवादळाचे केंद्र असेल. हे अंतर नगर शहरापासून दोनशे, तर भीमा नदीकाठच्या श्रीगोंदे तालुक्‍यापासून सुमारे एकशे वीस किलोमीटर आहे. या वादळाचा प्रभाव चारही दिशांना शंभर किलोमीटरपर्यंतच आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पलीकडे पावसाचे प्रमाण वाढेल. सातारा व वडूज भागात वादळी पाऊस होण्याची शक्‍यता आहे. 

चक्रीवादळ उद्या (गुरुवारी) सायंकाळी मुंबईच्या दिशेने कूच करायला सुरवात करील. मात्र, त्याने यापूर्वीच दिशा बदलली असल्याने, मुंबईत न जाता रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी बंदरातून ते अरबी समुद्रात प्रवेश करील. त्याच्या या संभाव्य मार्गात वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

दरम्यान, रविवारपासून (ता. 18) नगर जिल्ह्यातून पाऊस आपला गाशा गुंडाळेल, गारवा वाढेल व धुके पडायला सुरवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

वादळी पाऊस होणार

हवामान खात्याच्या संकेतस्थळानुसार, दिशा काहीशी बदलून चक्रीवादळ दक्षिणेकडे सरकल्याने, दक्षिण नगर जिल्ह्यात त्याच्या प्रवेशाचा धोका टळला आहे. आता ते कर्नाटकाच्या सीमेवरून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते झाले. सातारा व वडूज भागात ते गुरुवारी केंद्रित होईल. तेथे वादळी पाऊस होईल. त्यामुळे दक्षिण नगरचा धोका कमी झाला, असे म्हणायला हरकत नाही, असे मत जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT