0Nilesh_20Lanke_20and_20Vijay_20Auti (1).jpg 
राज्य

त्या वेळी मी आमदार असतो तर पारनेर कारखाना वाचला असता

मार्तंड बुचुडे

पारनेर : "मुंबई याला कळेल का, अशी टीका करणाऱ्यांना साधे पारनेर कळले नाही. मी वर्षात तालुक्‍यात एवढा निधी आणला. त्यांनी 15 वर्षे काय केले, याचे संशोधन करावे. मी आमदार असतो, तर पारनेर साखर कारखान्याची विक्री होऊ दिली नसती. शेतकरीहितासाठी दूध संघ चांगल्या पद्धतीने चालवून दाखवू,'' असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. 

पारनेर तालुका दूध संघातर्फे दूध संस्थांना त्यांच्या सुमारे 40 लाख रुपयांच्या ठेवींचे वितरण करण्यात आले. त्या वेळी लंके बोलत होते. संघाचे नूतन प्रशासकीय अध्यक्ष दादासाहेब पठारे तसेच मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांचे नाव न घेता आमदार लंके यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. यापूर्वीच मी आमदार असतो, तर तालुक्याचा विकास करून दाखविला असता. एका वर्षात बरेच कामे करता आले, याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले. आगामी काळात विविध कामे करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

लंके म्हणाले, ""संघ चालविण्यासाठी दूरदृष्टी असणारा नेता हवा होता, तो आता मिळाला आहे. येथे चांगल्या विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन संघ ऊर्जितावस्थेत आणावा. मी पाहिजे ते सहकार्य करीन. नारायणगव्हाण येथील संघाच्या जागेची नोंद होण्यासाठी मदत करीन. फक्त संघाच्या आवारात राजकारण आणू नका. दूध संघात राजकारण सुरू झाल्याने मी संघात लक्ष घातले. थेट प्रशासक नेमण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, "तुम्ही आमच्या दूध संघात लक्ष घालू नका,' असे सांगितले. नंतर प्रशासक आले. मी एखाद्या कामात लक्ष घातले, तर ते काम पूर्ण केल्याशिवाय बाजूला होत नाही.'' 

अध्यक्ष पठारे म्हणाले, ""संघाची अवस्था खूप वाईट झाली आहे. मात्र, पुढील वर्षभरात संघाचे एक लाख लिटर दूधसंकलन करण्याचा मानस आहे. तसेच, 50 गावांत दूध संस्थेला बल्क कुलर देणार आहोत.'' 

चोरीस गेलेल्या यंत्रसामग्रीचे काय

""दूध संघातील अनेक प्रकारचे साहित्य चोरीस गेले आहे. मात्र, ज्यांची सत्ता होती, त्यांनी पोलिसांत साधी तक्रारही दिली नाही. चोरीला गेलेल्या यंत्रसामग्रीची फिर्याद नाही, याचा अर्थ कुंपणानेच शेत खाल्ले. आम्ही त्याचा शोध घेणार आहोत. त्यांना मोकळे सोडणार नाही,'' असे सदस्य संभाजी रोहकले यांनी सांगितले. 

Edited By - Murlidhar karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT