commissinor astik kumar pandy warn news
commissinor astik kumar pandy warn news 
राज्य

हौस म्हणून संचारबंदीत फिराल, तर थेट गुन्हा दाखल होणार..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबादः शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा सात हजार आणि मृतांची सख्या तीनशे पार गेल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने नव्याने १० ते १८ जुलै दरम्यान, खऱ्या अर्थाने कडक संचारबंदीची तयारी सूरु केली आहे. त्यासाठी कठोर नियमावली आणि कारवाईचे नियोजन करण्यात आले असून संचारबंदीच्या काळात हौस म्हणून किंवा विनाकारण दुचाकीवर फिरणाऱ्या व्यक्तींवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. एवढेच नाही तर त्यांची गाडी जप्त करून, वाहन चालवण्याचा परवाना देखील निलंबित केला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त आस्तीक कुमार पांडेय यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आणि ठपका ठेवण्यात आला होता. गेल्या दहा दिवांपासून शहरात दररोज नव्याने वाढणाऱ्या रुग्णांची संख्या ही दोनशे पेक्षा अधिक असल्याने सगळ्यांचीच झोप उडाली होती. यावर शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी केली जात होती.

त्यामुळे दहा जुलैपासून आठवडाभर शहरात कडक जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला. पंरतु हा जनता कर्फ्यू कुठल्याही परिस्थ्तीत यशस्वी करून कोरोनाची साखळी तोडायचीच या निर्धाराने जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.

महापालिकेचे आयुक्त आस्तीक कुमार पांडेय यांनी या संदर्भात माहिती देतांना सांगितले की,  नव्याने करण्यात येणारा लॉकडाऊन हा अधिक कडक आणि कठोर असणार आहे. विनाकारण बोहर फिरणाऱ्यांची संचारबंदीच्या काळात गय केली जाणार नाही. मोटारसायकलवरून बाहेर फिरणाऱ्यांवर आता थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच त्यांचे वाहन, लायसन्स जप्त करून वाहनांची नोंदणी आणि वाहन परवाना देखील निलंबित करण्यात येणार आहे.

महापालिकेने दोनशे जणांचे एक विशेष पथक तयार केले असून ते पोलिसांच्या मदतीला संचारबंदीच्या काळात तैनात असणार आहे. संचारबंदीच्या काळात सकाळी ६ ते ८ या दोन तासांत केवळ दूध आणि वृत्तपत्र वाटपाला सूट देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र शहरात कुणालाही रस्त्यावरून फिरू दिले जाणार नाही.

या शिवाय कुठल्याही कारणासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तीला स्वॅब चाचणी व अधिकृत पास शिवाय जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाहीये. शहरात येणाऱ्या सर्व सीमांवर आमचे पथक तैनात राहणार आहे. अत्यावश्यक काम असेल तर आणि तरच अधिकृत पासची पाहणी आणि संबंधित व्यक्तीचे स्वॅब घेऊनच त्यांनी जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश देणार असल्याचेही पांडेय यांनी स्पष्ट केले. जनता कर्फ्यूच्या काळात शहरात सुमारे ५० हजार चाचण्या करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT