extend lockdown 31 may news
extend lockdown 31 may news 
राज्य

लॉकडाऊन ३१ पर्यंत वाढवा; रमजान ईदही घरातच साजरी करू 

सरकारनामा ब्युरो

बीड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यांत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राम नवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, शब-ए बारात, महाराष्ट्र दिन आदी सण- उत्सव साध्या पद्धतीने साजरे झाले. आता रमजान ईदही घरात बसूनच साजरी करू असे आवाहन जिल्हा सनियंत्रण दिशा समितीचे सदस्य तथा भाजपचे सलीम जहाँगीर यांनी केले. आणखी लॉकडाऊनमध्ये आणखी १४ दिवसांची वाढ करून तो ३१ मे पर्यंत वाढवावा, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई मेलद्वारे केली आहे.

कोविड - 19 ची परिस्थिती गंभीर असल्याने घरातून बाहेर पडणे आणि गर्दी करणे म्हणजे कोरोनाला बोलावून घेण्यासारखे आहे. त्यामुळे रुग्ण वाढीचे गांभीर्य पाहता राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात यावा, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.  कोरोना आजाराचा फैलाव होऊ नये म्हणुन तातडीने उपाययोजना राबविल्याने देशात, राज्यात विषाणूचा संसर्ग रोखणे शक्य झाले आहे. आता कोरोनाचा संसर्ग शेवटच्या टप्यात असून रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर गर्दीला आळा घालून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी झोनची संकल्पना दूर ठेवून आणखी १४ दिवसांचे लॉकडाऊन वाढवावे असेही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

पर राज्यातील, जिल्ह्यातील ऊसतोड मजूर आणि अन्य क्षेत्रातील मजूर व कामगार आपआपल्या जिल्ह्यात परत येत आहेत. अशावेळी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. महत्त्वाचे सर्वधर्मीय सण - उत्सव अगदी साध्या पद्धतीने आणि घरातच साजरे झाले. त्याचप्रमाणे आता रमजान ईदही सर्व मुस्लिम समाज बांधव घरातच आणि साधेपणाने साजरी करतील. ईद पुढच्या वर्षीही येईल, मात्र मानव जातीचे जीवन अनमोल आहे, ते जर गेले तर पुन्हा येणार नाही.

केंद्र सरकारने गोरगरिबांना तीन महिन्याचे धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाही गॅस मोफत देण्यात येत आहे. अशा वेळी नागरिकांनी सतर्क राहणे हीच सर्वात मोठी उपाययोजना ठरू शकते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी कोणत्याही शॉपिंग माॅल किंवा दुकानांना सुरू ठेवण्याची परवानगी देवू नये. त्याचबरोबर ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन अशी सूट न देता सरसकट लॉकडाऊन कायम ठेवावा. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ठराविक वेळ देवून राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा, असेही जहाॅंगीर यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT