Fadanvis Bhandara
Fadanvis Bhandara 
राज्य

कोरोनाच्या नियंत्रणासाठी चाचण्या वाढवाव्या : देवेंद्र फडणवीस

Abhijeet Ghormare

भंडारा : कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी पुढील एक महिना महत्वाचा आहे. या लढ्यात भंडारा जिल्ह्याचे आत्तापर्यंतचे काम समाधानकारक आहे. पण या स्थितीत प्रभावीपणे लढा देण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे आवश्‍यक असल्याचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असले तरी भंडारा जिल्ह्याची नेमकी काय परिस्थिती आहे, याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड केअर सेंटरला भेट देऊन जाणून घेतली. कोविड युद्धातील भंडारा जिल्ह्याचे आतापर्यंत काम समाधानकारक असले तरी कोरोनाची साथ आणि मृत्यू रोखण्यासाठी पुढील एक महिना महत्वाचा असल्याचे ते म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. फडणवीस म्हणाले, भंडारामध्ये आरटी-पीसीआर सुविधा नाहीत. या सुविधा लवकरच उपलब्ध करून घेण्यावर भर द्यावा.

भंडाऱ्यात सध्या कोविड १९ चा संसर्ग दर सहा टक्के आहे. गेल्या काही दिवसांपासून मृत्यूदर वाढत असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. सद्यःस्थितीत दिवसाला २४० चाचण्या केल्या जातात, त्या ५०० पर्यंत वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या तीन तालुक्यांमध्ये रुग्ण अधिक आहेत. त्यांना भंडारा येथे आणत असल्यामुळे मुख्यालयात बेड कमी पडत आहेत. त्यामुळे त्याची व्यवस्था लवकरच करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी यावेळी त्यांना सांगितले. चाचण्या वाढल्यावर रुग्णवाढीचा वेग काय राहील, हे सुद्धा बघावे लागते. त्यामुळे भंडारासारख्या ठिकाणी पुढील काही दिवस महत्त्वाचे राहणार आहेत. 

बरे होणारे रुग्ण ६० टक्के व मृत्यू दर १.३ टक्के आहे. मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी काम झाले पाहिजे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. बैठकीला जिल्हा प्रशासनातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. परिणय फुके, खासदार सुनील मेंढे यावेळी त्यांच्यासोबत होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT