Nawab Malik
Nawab Malik 
राज्य

रोजगारापेक्षा कोरोनातून नागरिकांचे जीव वाचवणे महत्वाचे : नवाब मलिक

Abhijeet Ghormare

भंडारा : कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. लॉकडाऊनमुळे लोकांच्या, विशेष करून मजुरांच्या हाताला काम उरले नाही. त्यामुळे दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत झाली आहे. अशातच ‘रोजगार हमीची कामे देण्यापेक्षा कोरोनातून लोकांचा जीव वाचविणे महत्वाचे आहे’, असे वक्तव्य गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. 

तसे पाहता नवाब मलिकांचे म्हणणे काही चुकीचे नाही. कोरोनाच्या हाहाकारात लोकांचे जीव वाचविणे महत्वाचे आहेच. पण सोबतच गरीब, मजूरदार वर्गाला दोन वेळचे जेवण मिळावे, याचीही व्यवस्था करणे गरजेचे आहे. गरीब मजुरांच्या हाताला कामच नसेल तर ते खातील काय, याचाही विचार पालकमंत्र्यांनी करावा. नाहीतर कोरोनातून वाचवता वाचवता उपासमारीने लोक मरायला लागली, तर त्याची जबाबदारी पालकमंत्री मलिक घेतील काय, असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे. 

कोरोनाने पटापट लोक मरत असताना कुणालाही विनाकारण बाहेर जाण्याचा शौक नाहीये. पण टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी गरिबांना बाहेर पडावेच लागते. रोजगार हमी योजनेची कामे सुरू राहिली तर किमान पोटाचा प्रश्‍न तरी सुटेल, अशी मागणी आहे. तर ते उपलब्ध करून देण्याचे सोडून पालकमंत्री भलतेच काय बोलले, अशी टिका आता नवाब मलिकांवर होत आहे. गोंदिया जिल्ह्यात अद्यापही रोजगार हमी योजनेची कामे सुरू झालीच नाहीत. त्यामुळे मजूरवर्ग हवालदिल झाला आहे. 

हाताला काम नसल्याने मजुरवर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे बाजार बंद राहात असल्याने हाताला इतर कामही मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाने जीव जाईल तेव्हा जाईल, पण उपासमारीने लोक मरू नये, येवढी तरी व्यवस्था प्रशासनाने करावी, अशी रास्त मागणी आहे. पालकमंत्र्यांनी आज केलेल्या विधानामुळे नवा वाद उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. असे काही होण्यापूर्वी त्यांनी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे आणि रोजगार हमीची कामेच सरकार देत नसेल तर बेरोजगारी भत्ता तरी द्यावा, अशी मागणी आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT