2rajendra_bhosale_40ias_1.jpg
2rajendra_bhosale_40ias_1.jpg 
राज्य

के.के. रेंज ! जिल्हाधिकाऱ्यांकडून सराव प्रशिक्षणासाठी अधिसूचना क्षेत्र जाहीर 

सरकारनामा ब्युरो

नगर : युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना अधिनियमाने प्रदान केलेल्या अधिकारान्वये के. के. रेंज नगर लष्कराच्या गोळीबार क्षेत्रालगतचे क्षेत्र 15 जानेवारी 2021 ते 14 जानेवारी 2026 या काळात जिवंत दारू गोळ्यासह मैदानी व तोफखाना सराव प्रशिक्षणासाठी अधिसूचना क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही अधिसूचना प्रसिद्ध केली. पारनेर, राहुरी व नगर तालुक्‍यांतील 23 गावांमागील शुक्‍लकाष्ठ संपले नसल्याचेच या आदेशाने समोर आले आहे. 

तिन्ही तालुक्‍यांतील 23 गावांतील ठिकाणे वेगवेगळ्या दिवसांकरिता, वेगवेगळी लक्ष्य साध्य करण्यासाठी, तसेच प्रशिक्षणातील विविधता आणि विशिष्ट गाव अथवा गावाच्या समुहाचे सततचे स्थलांतर टाळण्यासाठी निवडली आहेत. या क्षेत्रातील फक्‍त अशीच गावे व धोकादायक क्षेत्र म्हणून असलेली जागा सरावासाठी आवश्‍यक दिवशीच महसूल अधिकाऱ्यांमार्फत धोकादायक क्षेत्र म्हणून नोटीस देऊन खाली करण्यात येणार आहेत. सरावाच्या कालावधीदरम्यान स्थलांतराची कारवाई केली जाणार नाही, असे नोटीसीत स्पष्ट केले आहे. 

के.के. रेंजसाठीच्या या वाढीव क्षेत्रात तीन तालुक्‍यांतील खासगी जमीन 10 हजार 798.96 हेक्‍टर, सरकारी जमीन 3597.11 हेक्‍टर व वनजमीन 11 हजार 223.62 हेक्‍टर आहे. नगर तालुक्‍यातील देहरे, इस्लामपूर, शिंगवे, नांदगाव, सुजलपूर, घाणेगावचा त्यात समावेश आहे. नगर तालुक्‍यातील गावांतील खासगी क्षेत्र 991.27 हेक्‍टर, सरकारी जमीन 150.85 हेक्‍टर व वनजमीन 113.11 हेक्‍टर आहे. राहुरी तालुक्‍यातील बाभुळगाव, जांभूळबन, जांभळी, वरवंडी, बारागाव नांदूर, कुरणवाडी, घोरपडवाडी, चिंचले, गडाखवाडी, दरडगावथडी, वावरथ येथील जमिनींचा समावेश आहे. राहुरीतील खासगी जमीन 4130.64 हेक्‍टर, सरकारी जमीन 2260.52 हेक्‍टर व वनजमीन 5657.76 हेक्‍टर आहे. पारनेर तालुक्‍यातील वनकुटे, पळशी, वडगाव सावताळ, गाजदीपूर, ढवळपुरी येथील खासगी जमीन 5677.05 हेक्‍टर, सरकारी जमीन 1185.74 हेक्‍टर व वन जमीन 5452.75 हेक्‍टर आहे. 
संबंधित गावांमधील समाविष्ठ असलेले सर्व्हे क्रमांक, गट क्रमांक व फॉरेस्ट कंपार्टमेंट क्रमांकनिहाय यादी संबंधित तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रसिद्ध केली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कळविले आहे. के.के. रेंजबाबत महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT