Krishna Sugar Factory Karad 
राज्य

कोरोनामुळे 'कृष्णा'ची रणधुमाळी लांबणीवर?

कोरोनाच्या काळात निवडणुक प्रक्रिया राबवणे तांत्रिकदृष्टया अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे 50 हजाराच्या घरात सभासद असलेल्या 'कृष्णा'च्या यंदाच्या सत्ताधाऱ्यांची सत्तेची खुर्ची अजूनही काही महिन्यासांठी स्थिर राहणार आहे.

अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची प्रस्तावित पंचवार्षिक निवडणूक कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात येणार आहे. या महिन्याच्या अंतिम टप्प्यात निवडणुक होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे आणखी सहा महिने मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी भोसले गटाला कारखान्यातील सत्ता अबाधित राहण्याचा बोनस मिळणार आहे.

कोरोनाच्या काळात निवडणुक प्रक्रिया राबवणे तांत्रिकदृष्टया अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे 50 हजाराच्या घरात सभासद असलेल्या 'कृष्णा'च्या यंदाच्या सत्ताधाऱ्यांची सत्तेची खुर्ची अजूनही काही महिन्यासांठी स्थिर राहणार आहे. 


यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा व सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यात आहे. कारखान्याची सभासद संख्याही 50 हजाराच्या घरात आहे. त्यामुळे कृष्णेची निवडणुक राज्यात चर्चेची ठरते. कारखान्याच्या सत्तेच्या सारीपाठावर ऐतिहासिक स्थित्यंतरे झाली आहेत. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री (कै.) यशवंतराव मोहिते कारखान्याच्या पहिल्या प्रवर्तक मंडळाचे अध्यक्ष राहिले.

काही दिवसात त्यांची राज्याच्या मंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर अध्यक्षपदाची सूत्रे त्यांनी धाकटे बंधू (कै.) जयवंतराव भोसले यांच्याकडे दिली. त्यानंतर 1989 पर्यंत तब्बल 30 वर्षे भोसलेंनी अध्यक्षपद संभाळले. 1987 ला या दोघा भावंडात राजकीय ठिणगी पडल्याने त्यावर्षी ऐतिहासिक संघर्ष पेटला. (कै.) मोहिते यांच्या नेतृत्वाखाली रयत पॅनलचे 1989 साली संचालक मंडळ सत्तेवर आले. तेथुनपुढे 10 वर्षे सत्तेची सूत्रे मोहिते यांचे पुतणे मदनराव मोहिते यांच्याकडे होती.

त्या सत्तेस (कै.)  भोसलेंनी सहकार पॅनेलच्या माध्यमातून आव्हान देत सत्तांतर घडवले. 1999 ला डॉ. सुरेश भोसले यांच्याकडे सत्तेच्या चाव्या आल्या. त्यांचा कार्यकाळ 2004 साली संपणार तोच ऊसावरील लोकरी माव्याच्या संकटामुळे डॉ. भोसले यांच्या अध्यक्षपदास एक वर्षाची मुदतवाढ मिळाली. त्यानंतर 2005 साली सत्तांतर होऊन मोहिते यांचे चिरंजीव डॉ. इंद्रजीत मोहिते अध्यक्ष झाले. त्यानंतर 2007 साली मोहिते व भोसले घराण्यात मनोमिलन झाले. 

दोन घराण्यांच्या राजकीय तडजोडीला फटकारत अविनाश मोहितेंच्या संस्थापक पॅनेलला सत्ता मिळाली. पाच वर्षे संस्थापक पॅनेल सत्तेवर राहिली. तत्कालीन सत्ताधारी व भोसेल गटाचे काही संचालक निवडुन आले. त्यात भोसले गटाची संख्या अधिक असल्याने 2015 मध्ये डॉ. भोसले अध्यक्ष झाले. त्यांच्या कारभाराची पुढील महिन्यात मुदत संपत आहे. परंतु कोरोनाच्या संकटात सहकार खात्यास निवडणुकीची प्रक्रिया राबवण्यात अडथळे येत असल्यामुळे काही महिने का होईना डॉ. भोसलेंची खुर्ची स्थिर राहणार आहे.

विद्यामान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले 1999 मध्ये पहिल्यांदा अध्यक्ष झाले. त्यांनतर 2004 साली त्यांना ऊसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव आल्यानंतर एक वर्ष मुदतवाढ मिळाली होती. आताही डॉ. भोसलेच अध्यक्ष आहेत. कोरानाच्या आपत्तीमुळे त्यांची सत्ता काही महिनेतरी स्थिर राहणार आहे. डॉ. भोसले यांच्या अध्यक्षपदाची 1999 नंतरची सहा वर्षे आणि यंदा कार्यकाळ संपत असतानाच कोरोनामुळे मिळणारी मुदतवाढ असा डॉ. भोसले यांच्याच नावावर सर्वाधिक काळ अध्यक्षपदी राहण्याचा विक्रम नोंदविला जाणार आहे.  


शासनाने कोरोनाच्या संकटामुळे जून-जुलै महिन्यात होणाऱ्या राज्यातील साखर कारखान्याच्या निवडणुकांना पुढील आदेश होईपर्यंत ऑगस्टअखेर स्थगित केले आहे. यामध्ये कृष्णेचाही समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात शासनाची दिशा स्पष्ट झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया कार्यान्वित होईल, अशी शक्यता आहे.

- सूर्यकांत दळवी [कार्यकारी संचालक, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, कऱ्हाड]
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT