mp bhagwat karad news about lockdown
mp bhagwat karad news about lockdown 
राज्य

हा शेवटचा लॉकडाऊन, पुन्हा शहर बंद करणार नाही...

सरकारनामा ब्युरो

औरंगाबादः जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या, मृतांचे प्रमाण पाहता एका कडक लॉकडाऊनची गरज होती. आर्थिक नुकसान होत आहे, लोकांचा रोजगार, व्यापार, व्यवसाय बुडतो आहे, हे जरी खरे असले तरी त्यापेक्षा लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे आहे. त्यामुळे व्यापारी, उद्योजकांचा लॉकडाऊनला विरोध असला तरी आम्ही त्यांचे मन वळवले. १० ते १८ जुलै दरम्यान, शहरातील लॉकडाऊन हा शेवटचा लॉकडाऊन असले या अटीवरच त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे जनतेनेही नियमांचे पालन करून जनता कर्फ्यूच्या दरम्यान घरातच राहून कोरोनाची साखळी आणि रुग्णांची संख्या कमी करण्यात प्रशासनाची मदत करावी, असे आवाहन भाजप खासदार डॉ. भागवत कराड यांनी केले.

शहरात लॉकडाऊन करण्यावरून अनेक मतमतांतरे होती, दोन अडीच महिन्यांपासून कंपन्या, उद्योग, व्यापार बंद असल्याने व्यापारी आणि उद्योजकांनी लॉकडाऊन नको, अशीच भूमिका घेतली होती. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तर लॉकडाऊनच्या संदर्भातील बैठकीलाच अनुपस्थित राहात आपली नाराजी दाखवून दिली होती. सध्या जिल्हा प्रशासन आठवडाभराचा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी कामाला लागले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. भागवत कराड यांनी ‘सरकारनामा‘शी बोलतांना लॉकडाऊन का आवश्यक होता? याबद्दल आपले मत व्यक्त केले.

डॉ. कराड म्हणाले, नोकरी, व्यवसाय, उद्योग, पैसा की माणसाचा जीव हाच पर्याय आमच्या समोर लॉकडाऊनचा निर्णय घेतांना होता. निश्चितच लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान झालेले आहे, होत आहे. पण कोरोनाची साखळी तोडणे देखील तितकेच महत्वाचे आहे. ज्या प्रमाणात शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची आणि मरण पावणाऱ्यांची संख्या वाढते आहे, ते पाहता कठोर होऊन हा निर्णय भाग होते. प्रशासन, लोकप्रतिनधी आणि व्यापारी, उद्योजकांच्या बैठकीत यावर चर्चा झाली तेव्हा उद्योजक, व्यापारी पुन्हा लॉकडाऊन लागू करावा या मताशी सहमत नव्हते. त्यांची भूमिका योग्यच होती, पण हा शहराती शेवटचा लॉकडाऊन असेल, यापुढे पुन्हा शहर बंद ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही लोकप्रतिनिधी व प्रशासनाने देखील दिली. त्यानंतर त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला.

आज शहरात ज्या झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढतयेत, ते पाहता रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड उपलब्ध होतील की नाही? अशी भिती मनात निर्माण व्हायला लागली आहे. शहर आणि जिल्ह्याला या कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी काही कठोर उपया करावेच लागतील. त्यामुळेच अगदी मेडीकल, किराणा दुकाने यांना देखील संचारबंदीमधून सुट देण्यात आलेली नाही. केवळ हॉस्पीटलच्या शेजारी असलेले मेडीकल दुकान उघडे ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना जनतेनेही संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाच्या विळख्यातून जिल्ह्याची सुटका करण्यासाठी जबाबदारीने वागावे,  असे आवाहनही कराड यांनी केले.

इम्तियाज यांचाही पाठिंबा..

शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येऊ नये अशी भूमिका खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली होती. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी लोकांची मते देखील याबाबत जाणून घेतली होती. तर काही दिवसांपुर्वी शहरात सायंकाळी ७ ते पहाटे ५ दरम्यान लागू करण्यात आलेल्या संचारबंदी बद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवाय काल झालेल्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या संयुक्त बैठकीला देखील ते गैरहजर राहिले. यावर देखील डॉ. कराड यांनी स्पष्टीकरण दिले.

इम्तियाज जलील यांचा देखील लॉकडाऊनला पाठिंबा आहे. कालच्या बैठकीला जरी ते हजर नव्हते, तरी त्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना फोनवरून काही कारणामुळे मी मिटिंगला येऊ शकणार नाही, पण जो निर्णय घेतला जाईल, त्याला माझा पाठिंबा असेल असे सांगतिले होते. केंद्रेकरांनीच बैठकीत ही माहिती दिली होती, असेही डॉ. कराड यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT