माळेगाव : दादा... राष्ट्रवादीकडून तिकीट मिळविण्यासाठी आमची गटबाजी होती. आता मात्र आमच्यात एकमत झाले असून तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य राहील, अशा शब्दात राष्ट्रवादी पुरस्कृत निलकंठेश्वर पॅनेलच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खाद्यावर मान ठेवली. तशीच काहीशी स्थिती सत्ताधारी शेतकरी पॅनेलच्याबाबतीत आज पहावयास मिळाली. या पॅनेलच्याही बहुतांशी उमेदवारांनी आपापले सह्यांचे विड्राॅल ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांच्याकडे देण्यास सहमती दर्शविली. त्यामुळे उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोणता नेता सावतासुभा घेतो त्याची उत्सुकता आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर उमेदावारी अर्ज माघारी घेण्याचा उद्या सोमवार (ता. १०) रोजी शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत येऊन आज (रविवार) निलकंठेश्वर पॅनेलमधील उमेदवारांच्या यादीला अंतिम स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील पाचही गटातील इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये असलेली गटबाजी कमी करण्याचा प्रयत्न केला.
विशेषतः पणदरे गटातील जगताप अडणावांमध्ये असलेले आपापसातील मतभेद संपविण्याच्या दृष्टीने माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, अॅड. केशवराव जगताप, मंगेश जगताप, स्वप्नील जगताप, अॅड.एस.एन. जगताप यांची पवार यांनी स्वतंत्र बैठक यशस्वी केली.
सांगवी गटामध्येही चौथी जागा वाढवून देण्याच्या आग्रही मागणीबाबतच्या भावनाही समजून घेण्याचा प्रयत्न पवार यांनी केला. सांगवी गटात सर्वकाही निर्णय घेण्याचे अधिकार अजितदादांना दिल्याची माहिती प्रकाश तावरे, किरण तावरे, महेश तावरे आदी शिष्टमंडळाने सांगितली. माळेगाव गटातसुद्धा चौथ्या जागेसाठी आग्रह झाला आहे.
दरम्यान, माळेगाव कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळातील बहुतांशी संचालक दोन्ही पॅनेलच्या माध्यमातून पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी सरसावले आहेत. त्यामध्ये चंद्रराव तावरे, रंजन तावरे, बाळासाहेब तावरे या प्रमुख नेत्यांबरोबर स्वरूप वाघमोडे, तानाजी कोकरे, सुरेश खलाटे, शशिकांत कोकरे, चितामनी नवले, अविनाश देवकाते, रामचंद्र देवकाते, प्रमोद गावडे, शिवाजी जगताप, जवाहर इंगुले, संगिता कोकरे, अश्विनकुमार सातव, विलास देवकाते आदींचा समावेश आहे. त्यामुळे या नेत्यांपैकी कोणाचा पत्ता कट होतो आणि कोणाची पुन्हा लॉटरी लागते हे सोमवारी दोन्ही बाजूचे पॅनेल जाहिर झाल्यानंतरच समजणार आहे.
दिलजमाई की लढाई याची उत्सुकता...!
माळेगाव कारखाना हा पवारसाहेबांचा समजला जातो. परंतु या कारखान्यात पवारांचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांची गेली पाच वर्षे सत्ता आहे. साखर कारखान्यावरील प्रभाव वगळता या दोन्ही तावरे मंडळींचा तालुक्याच्या राजकारणात कसलाच परिणाम दिसून येत नाही. हे चित्र लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीवरून स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे माळेगावची निवडणूक लढवायची कि बिनविरोध करायची याबाबतचे अजित पवार यांचे यांचे गुपित सोमवारी स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.