mira-bhaindar 
राज्य

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुक : नाराजांना रोखण्यासाठी भाजपची धावाधाव

महापौरपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव असून त्यासाठी आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे कल्पना म्हात्रे यांचा पत्ता कापला जाण्याची शक्‍यता आहे.

संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा

भाईंदर  : मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत बुधवारी (ता. 2) समाप्त होत आहे. सत्तारूढ भाजपने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर न करता संभाव्य "बंडोबांना थंडोबा करण्याचे' प्रयत्न चालवले होते.

 परंतु महापौर गीता जैन आणि अन्य काही जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षातील बंडाळी उफाळून आली आहे. सत्तेचे स्वप्न बघणाऱ्या या पक्षातील नाराजांना रोखण्यासाठी "चाणक्‍यां'ना धावपळ करावी लागत आहे. 
  
विविध सर्वेक्षणांच्या अहवालांनंतर ठरवलेली भाजपच्या 68 उमेदवारांची पहिली यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली होती. त्यांनी हिरवा कंदील दिलेल्या उमेदवारांची यादी सोमवारी (ता. 31) जाहीर केली जाईल, असे आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले होते.

तथापि, ही यादी जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारी अर्ज भरले जात असल्यामुळे भाजपमध्ये असंतोष उफाळला आहे. उमेदवारांच्या निवडीत आमदार मेहता यांची महत्त्वाची भूमिका असून काही ज्येष्ठ नगरसेवकांची नावे पहिल्या यादीत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर बंडाळी टाळण्यासाठी उमेदवारांची यादीच प्रसिद्ध न करण्याचा निर्णय भाजपला घ्यावा लागला आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे 267 इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले होते. महापौर गीता जैन यांच्यासह पक्षातील काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी आमदार मेहता यांचे पटत नाही. अशा अनेकांना डावलण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जातो. यंदाच्या महापालिका निवडणुकीतही विरोधकांचे पत्ते कापणे, जुन्यांना डावलून नव्यांना उमेदवारी असे प्रकार होण्याची शक्‍यता ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. 

परंतु पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे नगरसेविका दीप्ती भट, सुमन कोठारी, सुजाता शिंदे, प्रतिभा पाटील यांच्यासह माजी नगरसेवक रजनीकांत आणि सरस्वती मयेकर, स्नेहा पांडे व अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते भाजप सोडून शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांचा रोष भाजपवर नव्हे; तर आमदार मेहता यांच्यावर असल्याचे सांगितले जाते. 

प्रभाग क्र. 20, 5, 2, 14, 6 आदी ठिकाणी विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कापला जाणार, हे स्पष्ट आहे. अन्य काही प्रभागांत इच्छुकांची मोठी संख्या असल्याने बंडखोरीची शक्‍यता आहे. त्यामुळे भाजपने सावध पावित्र घेतला असून बंडखोरी टाळण्यासाठी वादग्रस्त प्रभागांतील जागा शेवटच्या क्षणी जाहीर करण्यासह "बी' फॉर्मचे वाटपही केलेले नाही. 

मुख्यमंत्री कोणत्या नावांवर शिक्कामोर्तब करतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्र. 5 मधून मुन्ना सिंह आणि वंदना पाटील यांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले; परंतु पाच वेळा निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक शरद पाटील आणि दोन वेळा निवडून आलेल्या वर्षा भानुशाली, मेघना रावल, राकेश शाह, भगवती रावल यांच्यावर मात्र टांगती तलवार आहे. 

प्रभाग क्र. 2 मधून ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले; परंतु त्यांच्या कन्या तथा दोन वेळा नगरसेविका झालेल्या कल्पना म्हात्रे, ज्येष्ठ नगरसेवक मदनसिंह, यशवंत कांगणो यांना मात्र लाल सिग्नल दाखवला आहे.

प्रभाग क्र. 20 मधून अश्‍विन कासोदरिया, हेतल परमार, नया वसाणी यांची नावे नक्की झाल्याचे सांगण्यात आले.

शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले प्रशांत दळवी यांना रविवारी अर्ज भरण्यास सांगितल्याने भाजप नगरसेवक दिनेश जैन आणि त्यांच्या समर्थकांनी निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जैन यांनी थेट शिवसेनेशी संपर्क साधला

. त्यामुळे धाबे दणाणलेल्या भाजप नेतृत्वाने दळवी यांना नकार देत जैन यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले. त्यामुळे दळवी यांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यांना प्रभाग क्र. 18 मध्ये जाण्यास सांगितल्याचे समजते. 

प्रभाग क्र. 14 मधून नगरसेवक अनिल भोसले, की नगरसेविका मीरा देवी यादव, अशी डोकेदुखी भाजप नेतृत्वाला लागली आहे. भोसले यांना डावलले जाईल, असे समजते. प्रभाग क्र. 4 मध्ये गणेश भोईर, मधुसूदन पुरोहित यांच्यापैकी कोणाची गच्छंती होणार, याची चर्चा रंगली आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT