zaware and lanke.png
zaware and lanke.png 
राज्य

आमदार लंकेकडून जनतेची दिशाभूल, जास्त ग्रामपंचायती आमच्याच : सुजीत झावरे

मार्तंड बुचुडे

पारनेर : तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायती सुजीत झावरे व विजय औटी यांच्या गटाच्या ताब्यात आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी 70 ग्रामपंचायतींवर सत्ता आल्याची वल्गना करीत असून, त्यातून जनतेची दिशाभूल करीत आहेत. लोकप्रतिनिधींचा हा बालिशपणा आहे, अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांनी केली. 

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की आमदारांनी ज्या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा घेतल्या, त्या ग्रामपंचायती त्यांच्या ताब्यातून गेल्या आहेत. खरे तर आमदार असणाऱ्या व्यक्तीने ग्रामपंचायत निवडणुकीत बूथवर बसून पदाची शान घालवली. विरोध हा तात्विक असावा, वैयक्तिक नसावा. मात्र, त्यांच्याकडे वैचारिक प्रगल्भता नसून, तालुक्‍याचे हे दुर्दैव आहे. बिनविरोध निवडणुका करण्याचा त्यांचा हेतू शुद्ध नव्हता. 

वासुंदेच्या निवडणुकीला त्यांनीच खीळ घातली

वासुंदे येथे 50 वर्षांत अपवाद वगळता नेहमी बिनविरोध निवडणूक होत होती. या परंपरेला लोकप्रतिनिधींनी खीळ घातली. गावातील काही लोकांना हाताशी धरून निवडणुकीस भाग पाडले. त्यांनी माझ्या गावात सभा घेऊन आमचे उमेदवार 300 पेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. दुसऱ्याच्या शैक्षणिक संस्थेत हस्तक्षेप करणे, तेथे पत्नीची वर्णी लावण्याचा प्रयत्न करणे. हे सामाजिक असभ्यतेचे लक्षणे असल्याची टीका झावरे यांनी केली. दरम्यान, आमदार लंके यांनी महाराष्ट्रभर बिनविरोधचा डंका वाजविला होता.

हेही वाचा..

ग्रामपंचायत निकालानंतर देवीभोयरे येथे मारामारी 

पारनेर : तालुक्‍यातील देवीभोयरे येथे ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर दोन गटांत तुफान मारामारी झाली. दगडफेकीत अनेक जण जखमी झाले. वाहनांची तोडफोड करण्यात आली. मारामारीत दोन्ही गटांचे कार्यकर्ते जखमी झाले. याबाबत परस्परविरोधी फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. 

याबाबत अशोक मुळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याने विकास सावंत, विश्‍वनाथ गाजरे, ज्ञानदेव बेलोटे, शिवाजी जाधव, रामकृष्ण जाधव, भाऊसाहेब बेलोटे, जगन बेलोटे, रामदास जाधव व कमलाकर बेलोटे यांनी जमावाने दगडफेक केली. त्यात चौघे जखमी झाले. 

प्रमिला सर्जेराव जाधव (रा. देवीभोयरे) यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की ग्रामपंचायत निकालानंतर अशोक मुळे, विठ्ठल सरडे, दत्तात्रेय मुळे, अंकुश बेलोटे, विनोद साळवे, मंगेश गाडे, विश्‍वनाथ बेलोटे, सुभाष बेलोटे यांनी मारहाण केली. वाद सोडविण्यासाठी आलेल्या मुलास शिवीगाळ करीत लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. 
पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष बेलोटे, माजी उपसरपंच विकास सावंत, रामकृष्ण जाधव, भाऊसाहेब बेलोटे, ज्ञानदेव बेलोटे, शिवाजी जाधव, विठ्ठल सरडे, अशोक मुळे, दत्तात्रेय मुळे, जगण बेलोटे यांना पोलिसांनी अटक केली. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT