Kishor Jorgewar - Rajesh Tope
Kishor Jorgewar - Rajesh Tope 
राज्य

आमदार जोरगेवार म्हणतात, ‘त्या’ १२० आजारांवरील शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करा...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून करण्यात येणाऱ्या १२० आजारांवरील शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्‍वासन मंत्री टोपे यांनी आमदार जोरगेवार यांना दिले. त्यामुळे गरिबांसाठी असलेली ही सुविधा लवकरच सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून १ एप्रिल २०२१ पासून बंद करण्यात आलेल्या १२० आजारांवरील शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात याव्या, यासाठी आमदार जोरगेवार आधीपासूनच आग्रही होते. आता आरोग्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिल्यामुळे या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू होतील. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून खाजगी रुग्णालयांत होणाऱ्या १२० आजारांवरील जीवनदायिनी शस्त्रक्रियांचे विमा संरक्षण १ एप्रिल २०२१ पासून काढून घेतले आहे. या आजारांमध्ये हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे काढणे, गर्भपिशवी काढणे यांसारख्या अनेक जीवघेण्या आजारांचा समावेश आहे.  

शासकीय रुग्णालयांच्या तुलनेत खाजगी रुग्णालयांतील उपलब्ध सोयीसुविधांमध्ये बरेच अंतर आहे. अनेकदा शासकीय रुग्णालयांमध्ये विशिष्ट आजारावर शस्त्रक्रियेची आवश्यकता भासल्यास त्या ठिकाणी सदर शस्त्रक्रिया करणारे तज्ञ डॉक्टर्स, सोयी व उपकरणे उपलब्ध नसतात. शासकीय रुग्णालयातील अशा अनेक त्रुटींमुळे सामान्य नागरिक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून खाजगी रुग्णालयात निःशुल्क शस्त्रक्रिया करून उपचार घेत होते. परंतु आता या योजनेतून १२० आजारांवरील शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्याने रुग्ण अडचणीत सापडले आहेत.

हेही वाचा : आरोग्यमंत्र्यांनी दिलेली मुदत उलटूनही व्हेंटिलेटरची प्रतीक्षाच!
  
आधीच कोरोना महामारीच्या काळात लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांना त्यांच्या जवळ उपलब्ध असलेला रोजगार गमवावा लागला आहे. तसेच कोरोना प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या आजारावर मात करण्याकरिता आर्थिक दृष्ट्य़ा ताण पडलेला आहे. त्यामुळे सामान्य व गरीब जनतेला कराव्या लागणाऱ्या महागड्या शस्त्रक्रियांचा आर्थिक भुर्दंड व त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आजारावर योग्य उपचार मिळण्याकरिता सहानुभूतीपूर्वक विचार करून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधील रद्द करण्यात आलेल्या आजारावरील जीवनदायी शस्त्रक्रियांना खाजगी रुग्णालयात पुन्हा विमा संरक्षण देत त्या सुरू करण्यात याव्या, असे निवेदनाच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT