Teacher Mla Vikram Kale news Latur 
राज्य

गावची ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी आमदार काळे सरसावले..

तत्कालीन आमदार वसंतराव काळे यांनीही पंचेवीस वर्षापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यात त्यांना यश आले होते, याची आठवणही आमदार काळे यांनी काढली आणि आता आपल्या प्रयत्नालाही यश येईल, अशी आशा व्यक्त केली.

विकास गाढवे

लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. या आघाडीतील सामंजस्य गावागावात ठळकपणे दिसून आले पाहिजे, असा आग्रह धरत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी रविवारी (ता. 27) बोरगाव (काळे, ता. लातूर) या स्वतःच्या गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न केले. गावातील काँग्रेसच्या दोन्ही गटांनी यासाठी सामजंस्य दाखवून निवडणूक बिनविरोध काढल्यास गावच्या विकासासाठी आमदार फंडातून दहा लाखाचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

आमदार काळे हे पळसप (ता. उस्मानाबाद) येथे वास्तव्यास असले तरी त्यांचे मुळ गाव बोरगाव (काळे) आहे. गावात त्यांच्या शब्दाला चांगले वजन आहे. शिक्षक हे त्यांचे मतदार असले तरी गावातील सर्वांसोबत त्यांचे सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सध्या गावच्या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लागली आहे. सर्वच आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी आमदारांनी निधी देण्याचीही घोषणा केली आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार काळे यांनी रविवारी सकाळी बोरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरच प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थांची बैठक घेतली. बैठकीत सर्वांना बिनविरोध निवडणूकीचे फायदे लक्षात आणून दिले. गावात निवडणूक लढवण्यासाठी तयार असलेले काँग्रेस पक्षाचे दोन गट आहेत. या दोन्ही गटांना ग्रामपंचायतीच्या तेरा जागा तसेच सरपंच व उपसरपंचपद सामंजस्याने आपापसात वाटून घेण्याची सूचना त्यांनी केली. महाविकास आघाडी सरकारमधील सामंजस्य या गटांनी प्रत्यक्षात आणून निवडणूक बिनविरोध काढल्यास दहा लाख रूपये निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली. 

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी तसेच गावात सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी आमदार काळे यांचा सातत्याने पुढाकार असतो. बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते भावकीतील असल्याने त्यांचा शब्द प्रमाण ठरतो. त्यांचे वडील व तत्कालीन आमदार वसंतराव काळे यांनीही पंचेवीस वर्षापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यात त्यांना यश आले होते, याची आठवणही आमदार काळे यांनी काढली आणि आता आपल्या प्रयत्नालाही यश येईल, अशी आशा व्यक्त केली.

Edited By : Jagdish Pansare
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT