Krishna Khopde
Krishna Khopde 
राज्य

आमदार खोपडे म्हणाले, मला बैठकीला का बोलावले नाही ? 

राजेश चरपे

नागपूर : स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीला मला का बोलावण्यात आले नाही, अशी विचारणा आमदार कृष्णा खोपडे कंपनीचे अध्यक्ष प्रवीण परदेसी यांना पत्राद्वारे केली आहे. अनियमितता आणि घोटाळे लपवण्यासाठी हेतुपूरस्सर वगळण्यात आले काय? याचा खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओपद महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेकायदेशीरपणे बळकावले आहे, असा आरोप महापौर संदीप जोशी यांनी याआधीच केलेला आहे. तशी तक्रारही त्यांनी सदर पोलीस ठाण्याला दिलेली आहे. 

स्मार्ट सिटीच्या सीईओपदावरुन सद्यस्थितीत घमासान सुरू आहे. त्यातच आमदार कृष्णा खोपडेंना बोलावले नसल्याने ते संतापले आहेत. आता रात्रभरात काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीलेले आहे. स्मार्ट सिटी कंपनीची बैठक उद्या शुक्रवारी बोलावण्यात आली आहे. यापूर्वी महापालिकेत स्मार्ट सिटी कंपनीच्या ज्या बैठका झाला त्यात मला तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास सोनवणे स्वतः फोन करून बोलावले होते. एवढेच नव्हे तर बैठकीची विषय पत्रिकासुद्धा घरी पाठवत होते. मात्र उद्या होणाऱ्या ऑनलाईन बैठकीची साधी सूचनाही आपणास देण्यात आली नाही. दोन दिवस अगोदर परदेसी यांच्याशी फोनवरून याबाबत संपर्क साधला असता त्यांनी बैठकीला बोलावण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र आजवर निमंत्रण देण्यात आले नाही. 

स्वतःला स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्याधिकारी असल्याचा दावा करणारे तुकाराम मुंढे यांनी संचालक मंडळाची बैठक झाली नसताना तसेच ठराव नसताना आर्थिक निर्णय घेतले. त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे निदर्शनास येते. आपल्या पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात झालेले घोटाळे व अनियमिततेबाबत प्रश्‍न उपस्थित होऊ नये, याकरिता बैठकीला बोलावण्यात आले नसावे, अशी शंकाही खोपडे यांनी व्यक्त केली. आमदारांना बैठकीत बोलावता येत नसेल तर यापूर्वी कुठल्या अधिकाराने आपण बैठकीत सहभागी करून घेतले, याचाही लेखी खुलास करावा, अशी विनंतीही कृष्णा खोपडे यांनी केली आहे. आमदार खोपडेंची विनंती मान्य केली जाते की नाही, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरले आहे.  (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT