चंद्रपूर : तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांना पोलीस विभागात व इतर विभागात दोन टक्के आरक्षण देऊन नोकरीत स्थान द्यावे, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
तृतीयपंथीयांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांना रोजगाराचे पुरेसे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये कौशल्य असूनही तृतीयपंथीय जगण्यासाठी रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात लोकांना आर्थिक मदत मागत असतात. अनेकांकडून त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. त्यामुळे त्यांना समाजात स्थान मिळवून देण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक स्रोत वाढावे, नोकरभरतीत त्यांचे प्रमाण वाढावे, यासाठी पोलीस विभागासह इतर विभागांत दोन टक्के आरक्षण देऊन शासकीय नोकरीत सहभागी करावे, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आताशा अनेक तृतीयपंथी शिक्षणाच्या प्रवाहात येत असून, सुशिक्षित होत आहेत. नोकरीत आरक्षण मिळाल्यास रोजगाराची हमी मिळेल आणि ते उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त होतील, असेही आमदार धानोरकर यांनी म्हटले आहे. तृतीयपंथीयांच्या विषयात आमदार धानोरकर केल्या काही दिवसांपूर्वीच सक्रिय झाल्या होत्या. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी ठोस काहीतरी करण्याचा मानस त्यांनी यापूर्वीच बोलून दाखवला होता आणि त्या दिशेने कामही सुरू केले आहे.
प्रतिभा धानोरकर यांनी यंदाची दिवाळी पती खासदार बाळू धानोरकर यांच्यासोबत त्यांच्या घरी तृतीयपंथीयांसोबत साजरी केली होती. तेव्हाच तृतीयपंथीयांसाठी निवास, नोकरी यांसदर्भात काम करणार, असे संकेत त्यांनी दिले होते. दिवाळी संपताच लगेच त्या कामाला लागल्या आणि आज त्यांनी एक टप्पा पूर्ण केला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांनी या मागणीचे निवेदन दिले. याचा पाठपुरावा करून त्या आरक्षण मिळवतीलच, अशा विश्वास तृतीयपंथीयांना आहे. कारण आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात दिशा कायदा अमलात आणावा, यासाठी त्या आग्रही होत्या. सर्वप्रथम नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनीच ही मागणी केली होती. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता आणि आज ‘दिशा’च्या धर्तीवर महिलांसाठी शक्ती हा कायदा आकार घेतो आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.