manse.png
manse.png 
राज्य

मनसे ठाम ! वाढीव वीज बिले मागे घेतले नाही, तर आंदोलन सुरूच ठेवणार

मुरलीधर कराळे

नगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने वीज बिल वाढीसंदर्भात राज्यस्तरीय आंदोनल करण्यात येत आहे. नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला. या वेळी सहकार सेनेचे सरचिटणीस अनिल चितळे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सरचिटणीस नितीन भुतारे तसेच कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

अनिल चितळे म्हणाले, की एप्रिल महिन्यांपासूनच्या कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. व्यवसायांना घरघर लागली. अनेकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या. एका बाजूला आजाराची भीती आणि दुसरी ठप्प झालेले अर्थकरण या दोन्ही आघाड्यावर नागरिक लढा देत असताना महाविकास आघाडी सरकाने नागरिकांना प्रचंड वीज बिल पाठवून शॉक दिल्याने जनतेचे डोळे पांढरे झाले. एरवी वर्षभराचं वीज देयक जितके येते, तितक्या विजेची आकारणी केवळ तीन महिन्यांच्या वापराबाबत सरकारने जनतेला पाठवली.

एप्रिल, मे, जून महिन्यात अनेक खासगी आस्थापनाची कार्यालये बंद होती, पण तरीही त्यांना पण मोठी वीज देयक पाठवली. पूर्वी जिझिया कर लावला जायचा, या सरकारने वीज देयकातून जिझिया कर लावला आणि जनतेची लूट करीत असल्याचा आरोप या वेळी केला. जोपर्यंत वाढीव वीज बिल मागे घेत नाही, तोपर्यंत मनसे आंदोलन करत राहील, असे चितळे यांनी सांगितले.

नागरिकांनी वीज बिले भरू नये

नितीन भुतारे म्हणाले, की आम्ही महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे की काही झालं तरीही वाढीव वीज देयकं भरु नका आणि हा असा असहकार पुकारल्याशिवाय सरकारलाही जनतेतील असंतोष जाणवणार नाही. सरकार तुमच्या वीजेची जोडणी तोडू शकत नाही आणि जर त्यांनी असा प्रयत्न केला, तर त्यांचा संघर्ष मनसे सैनिकांशी आहे, हे लक्षात ठेवा. सरकारने उगाच वाढीव वीज देयकं पाठवून संघर्ष करु नये. वीज देयकांत सवलत देत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.

या वेळी सचिन डफळ, अनिता दिघे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी सुरेखा कोते, स्मिता भुजबळ, श्रद्धा बावर, संजय शेळके, तुषार बोबडे, विनोद काकडे, सुरेश जगताप आदींसह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT