Vikas Thakre-Tukaram Mundhe
Vikas Thakre-Tukaram Mundhe 
राज्य

मुंढेंच्या आडमुठेपणामुळे मोमीनपुऱ्यातील महिलेचा मृत्यू : आमदार विकास ठाकरे

सरकारनामा ब्युरो

नागपूर : करोना प्रतिबंध क्षेत्र असलेल्या मोमिनपुरा येथील वृद्ध महिलेला महापालिका प्रशासनाच्या आठमुड्या आणि हेकेखोर धोरणामुळे प्राण गमवावा लागल्याचा आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला. मनपाने अडवणूक केल्याने तिला वेळेवर औषधोपचार मिळाला नाही, तसेच डॉक्‍टरांनासुद्धा या भागात येता आले नाही. यास महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हेच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. 

लॉकडाऊन करताना अंबाझरी येथील ट्रस्ट-ले-आऊटमध्ये देखील मनपाने नागरिकांच्या अन्नधान्याची, जेवणाची कोणतीही सोय केली नाही. या ठिकाणी गुरेढोरे देखील उपाशी मरत आहेत. परिणामी येथील लोकांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला. पार्वतीनगर, जवाहरनगर येथील नागरिक देखील भर उन्हात रस्त्यावर निघाले. मुंढे यांनी साथ रोग प्रतिबंधक कायद्याच्या नावाखाली संपूर्ण नागपूर शहराला वेठीस धरले आहे. मध्यवर्ती भागातील सर्वात मोठा भाजी बाजार असणाऱ्या कॉटन मार्केटमध्ये देखील घोळ घालून ठेवला आहे. तेथील व्यापाऱ्यांचे जगणे देखील मुंढे यांच्या अदूरदर्शी धोरणांनी मुश्‍किल करुन टाकले आहे. 

कॉंग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे यांनी आवाज उठवला असता झोनच्या सहायक आयुक्तांमार्फत तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या विरोधात लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम केले. मुंढे यांच्या या तुघलकी कारभाराविरोधात शुक्रवारी आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त संजीव कुमार यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात ठाकरे यांच्यासोबत अभिजित वंजारी, नगरसेवक संजय महाकाळकर, संदीप सहारे, उमाकांत अग्निहोत्री, पुरुषोत्तम हजारे, मनोज सांगोले, मनोज गावंडे, नितीन पुणेकर, हरीश ग्वालबंशी, नितीश ग्वालबंशी, रश्‍मी उईके, दर्शनी धवड, साक्षी राऊत, उज्ज्वला बनकर आदींचा समावेश होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT