MP Ranjitsingh Nimbalkar aggressive for Phaltan-Baramati railway line; Orders issued for forced land acquisition
MP Ranjitsingh Nimbalkar aggressive for Phaltan-Baramati railway line; Orders issued for forced land acquisition 
राज्य

फलटण-बारामती रेल्वे मार्गासाठी रणजितसिंह निंबाळकर आक्रमक; सक्तीने भूसंपादन करण्याचे दिले आदेश

किरण बोळे

फलटण शहर : फलटण - बारामती रेल्वे मार्गासाठी खासगी वाटाघाटीने मार्ग निघण्यात अडचणी येत असतील व जमीन अधिग्रहणासाठी नाहक वेळ वाया जाणार असेल. तर सदर जमिनी सक्तीने भूसंपादन करुन ताब्यात घ्याव्यात. रेल्वे मार्गाचे प्रलंबित कामे त्वरित सुरु करावित अशी सूचना निर्देश माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा सोलापूर विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे. 

फलटण - बारामती व फलटण-लोणंद रेल्वे मार्गाचे प्रलंबित अडचणीबाबत वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फलटण येथील तहसील कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.

यावेळी रेल्वे पुणे विभाग व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा, सहाय्यक  व्यवस्थापक जे. सी. गुप्ता, सहाय्यक व्यवस्थापक योगेंद्रसिंह बैस,फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, कोरेगावच्या प्रांताधिकारी श्रीमती ज्योती पाटील, फलटणचे तहसिलदार समीर यादव, रेल्वेचे अधिकारी जी. श्रीनिवास, राजेंद्र कुलकर्णी, सतीश कोंडलकर, मुख्य नियंत्रक एम. के. सिंबीयन, मनोरंजन कुमार, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, सुरवडीचे सरपंच जितेंद्र साळुंखे पाटील, सुनील यादव उपस्थित होते.
 
फलटण - बारामती रेल्वे मार्ग 37 किलोमीटर लांबीचा आहे. त्यामध्ये बारामती तालुक्‍यातील 13 व फलटण तालुक्‍यातील तीन गावातील जमिनींचे भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादन प्रक्रियेसाठी बारामती तालुक्‍याला 115 कोटी व फलटण तालुक्‍याला 15 कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्याचे यावेळी पुणे विभागीय व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा यांनी स्पष्ट केले. 

फलटण - लोणंद रेल्वे मार्गाचे भूसंपादन करताना काही शेतकऱ्यांचे केवळ एक ते तीन गुंठे क्षेत्र शिल्लक रहात आहे. ते वहिवाटणे संबंधित शेतकऱ्यांना फायदेशीर नसल्याने रेल्वेने सदर शिल्लक क्षेत्रासह संपूर्ण क्षेत्राचे भूसंपादन करावे, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे या मागणीवर  सकारात्मक निर्णय घेण्याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केली. 

फलटण-पुणे मार्गावर रेल्वे वाहतुकीस मान्यता मिळाली असल्याने लवकरच या मार्गावर प्रवासी व माल वाहतूक सुरु होणे अपेक्षित असल्याने या मार्गावरील किरकोळ दुरुस्ती, रेल्वे गेट, बायपास वगैरे प्रश्नांबाबत तातडीने निर्णय घेऊन संपूर्ण मार्ग वाहतुक योग्य होईल यासाठी नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना देतानाच या मार्गावरील सर्व गेट स्वयंचलित करावित. अंडरपासेस ठिकाणी रस्ते सुस्थितीत राहतील.

रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साठल्याने वाहतूक ठप्प होणार नाही. यासाठी योग्य व्यवस्था करावी तसेच फलटण रेल्वे स्टेशनची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत. दुरुस्ती असेल तर ती तातडीने करावी आणि स्टेशन इमारतीची मोडतोड, नासधूस टाळण्यासाठी तेथे सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत अशा सूचना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केल्या. 

आदर्की रेल्वे स्टेशन लोकवस्तीपासून दूर असून तेथे कोणतेही वाहन अगदी दुचाकी ही जाऊ शकत नसल्याने या स्टेशनवर उतरुन घराकडे जाणाऱ्या किंवा स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांना सात ते आठ किलोमीटर पायी चालत जावे लागते. हे स्टेशन आदर्की गावाजवळ स्थलांतरीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आदेश खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्यानंतर स्टेशन स्थलांतरीत करणे शक्‍य नाही. त्यापेक्षा तेथे जाण्यासाठी रस्ता करणे सोईस्कर होईल. त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.

वाठार स्टेशन येथे रेल्वेतून शेतमाल वाहतुकीची व्यवस्था, रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणामुळे पिंपोडे येथील रेल्वेगेट बंद झाल्याने तेथे पर्यायी मार्ग काढण्याची सूचना देऊन त्यासाठी आवश्‍यक निधी रेल्वे बोर्डाकडून मंजूर करुन आणण्याचे आश्वासन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले. या बैठकीनंतर वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समवेत फलटण व सुरवडी रेल्वे स्टेशन, रेल्वे गेट, बायपास वगैरेंची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व सूचनांनुसार आवश्‍यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT