MP Udayanraje will demand three seats for District Bank; Attention to the role of the NCP 
राज्य

जिल्हा बँकेसाठी उदयनराजे करणार तीन जागांची मागणी; राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठीची सर्व प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक होणार आहे. त्यामध्ये खासदार उदयनराजेंकडून याबाबतची मागणी होणार आहे. त्यानंतरच जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

उमेश बांबरे

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत खासदार उदयनराजे भोसले कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, जिल्हा बॅंक राजकारणविरहीत राहावी, अशी भूमिका घेत संचालकांच्या तीन जागांची मागणी करणार आहेत. येत्या शुक्रवारी (ता.२७) होणाऱ्या बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर बॅंकेच्या निवडणूकीबाबत सर्व नेत्यांची एकत्रित बैठक होणार आहे. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले या जागांची मागणी करणार आहेत. आजपर्यंत स्वत:ची एक जागा फिक्स  करण्यापलिकडे लक्ष न देणाऱ्या उदयनराजेंची मागणी राष्ट्रवादीकडून मान्य होणार का, हा प्रश्न
आहे. MP Udayanraje will demand three seats for District Bank; Attention to the role of the NCP

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक प्रक्रिया सुरु असून उद्या (बुधवारी) कच्ची मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यनंतरच निवडणुकीच्या हालचाली गतीमान होणार आहे. सध्यातरी इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे मागणी करण्यास सुरवात केली आहे. या सर्व प्रक्रियेत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

त्यांच्यापुढे दोन पर्याय होते. एकतर भाजपसोबत राहून त्यांच्या पॅनेलमध्ये सहभागी होणे किंवा राष्ट्रवादीच्या सर्वसमावेश पॅनेलमध्ये सहभागी होऊन आपली जागा फिक्स करणे असे होते. पण उदयनराजेंनी जिल्हा बॅंकेची निवडणूक पहिल्यापासून सावधगिरीने घेण्याची तयारी केली आहे. मागील निवडणूकीत ते गृहनिर्माण आणि पाणी पुरवठा मतदारसंघातून निवडून आले होते. तर एका निवडणुकीत त्यांनी विद्यमान पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा याच मतदरसंघातून पराभव केला होता. 

आताची निवडणूक ही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालीच होत आहे. त्यामुळे ते उदयनराजेंबाबत कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. पण, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत यावेळेस खासदार उदयनराजेंनी आपल्या स्वत:च्या संचालक पदासोबतच आणखी दोन जागा हव्या आहेत. त्यामुळे ते गृहनिर्माण आणि पाणी पुरवठा मतदारसंघातून यावेळेसही लढणार हे निश्चित आहे. 

पण त्यासोबतच ते राखीव जागांपैकी महिला राखीवमधील एक व अन्य एक अशा एकुण तीन जागांची मागणी करणार आहेत. त्यामुळे उदयनराजेंची ही मागणी सर्व समावेशक पॅनेल करताना राष्ट्रवादीचे नेते मान्य करणार का, हा प्रश्न आहे. ही मागणी मान्य झाली तर ठिक अन्यथा भाजपकडून विरोधात पॅनेलची तयारी होण्याचीही शक्यता आहे. 

दरम्यान, येत्या शुक्रवारी (ता. २७) जिल्हा बॅंकेची विद्यमान संचालकांची शेवटची सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यानंतर निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठीची सर्व प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक होणार आहे. त्यामध्ये खासदार उदयनराजेंकडून याबाबतची मागणी होणार आहे. त्यानंतरच जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT