Dhananjay munde and pankaja munde.jpg
Dhananjay munde and pankaja munde.jpg 
राज्य

पंकजासमोरच धनंजय मुंडेंची कुरघोडी! नेमका ठेवले मर्मावर बोट

मुरलीधर कराळे

नगर : बीड व नगर जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या गहिनीनाथ गडावर (जि. बीड) काल राष्ट्रवादी काॅंग्रेसची बुलंद तोफ तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व भाजपच्या नेत्या माजीमंत्री पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर होते. भाऊ-बहिणींमधील कडवा विरोध पाहता ते दोघेही एका व्यासपीठावर आल्याने उपस्थित अवाक झाले.

स्व. गोपिनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांचा वारसा त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी चालविला. राजकारणात त्यांनी आपले स्थान आपल्या कर्तुत्त्वार टिकवून ठेवले. असे असताना मागील निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तेथे त्यांचेच चुलतभाऊ धनंजय मुंडे यांनी विजय मिळवित मंत्रीपदही मिळविले. 

राजकारणात दोघेही वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्यामुळे एकमेकांविरोधात भाषणातून आगपाखड होणे स्वाभाविकच आहे. असे असताना काल ते दोघेही एकाच व्यासपीठावर आले. धनंजय मुंडे यांनी गहिनीनाथ गडावर जनता दरबार भरविला. तर पंकजा मुंडे यांनीही महापुजेला हजेरी लावली. दोघेही एकाच व्यासपीठावर असल्याने ते नेमके काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. झालेही तसेच. धनंजय मुंडे यांनी पंकजावर कुरघोडीचे भाषण केले. 

अशा मारल्या कोपरखळ्या

पंकजा मुंडे म्हणाल्या, ``यापूर्वी आम्ही अनेक कामे केली. आता या पंचवार्षिकमध्ये या मतदारसंघात विकासकामे करण्याला तुम्हाला शुभेच्छा आहेत.``

याला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी कोपरखिळी मारली. ``आता आम्ही विकासकामे करीत आहोत. तु्म्हाला शुभेच्छा द्याव्याच लागतील,`` असे ते म्हणाले. 

``बीडची जबाबदारी माझी आहे. येत्या चार वर्षात ऊसतोड मजुराचा नाही, तर ऊस पिकविणाऱ्यांचा जिल्हा म्हणून मी नव्याने ओळख करून देईल,`` असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले.

बीड जिल्ह्यात ऐकेकाळी पंकजा मुंडे यांचाच बोलबाला होता. पराभवामुळे तो काहीसा कमी झाला. तथापि, त्याच मर्मावर बोट ठेवत धनंजय मुंडे यांनी आपण बीड जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी घेतल्याचे सांगून पंकजा यांच्यावर एक प्रकारे कुरघोडी केली आहे. दरम्यान, या दोघांचीही जुगलबंदी व अबोला महाराष्ट्राने अनुभवला. 

मुंडे यांच्या त्या प्रकरणाची चर्चा तर होणारच

धनंजय मुंडे यांच्यावर झालेली चिखलफेक राज्याने पाहिली. रेणू शर्मा हिने मुंडे यांच्यावर आरोप केले. त्याला मुंडे यांनीही तितक्याच जबाबदारीने उत्तर देत काही गोष्टी मान्यही केल्या. संबंधित महिलेने तक्रार मागे घेतल्यानंतर हा वाद मिटला. त्यानंतर मुंडे यांनी साडेसाती जावी म्हणून की काय शिंगणापूरच्या शनिदेवाला अभिषेक केला. काल गहिनीनाथ गडावर गहिनीनाथांच्या पायी नतमस्तक झाले. या सर्व प्रकरणाची चर्चा उपस्थितांमध्ये झाली. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT