राज्य

कन्हैय्याकुमार पुन्हा कडाडला 

सरकारनामा ब्युरो

नगर : कन्हैयाकुमारच्या सभेला भाजपच्या काही कार्यकर्त्यांकडून झालेला विरोध, प्रशासनाकडून परवानगी देण्यास विलंब आणि सभा घेण्यावर ठाम असलेले रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या पार्श्‍वभूमीवर कन्हैयाकुमारची आज अखेर सभा झाली. त्यात कन्हैयाकुमार पुन्हा कडाडला. थेट पंतप्रधानांवरच शरसंधान साधत नरेंद्र मोदी म्हणजे देशाचे प्रचार व प्रसारमंत्री आहेत, अशी टीका त्याने केली. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तयार होण्याचे त्याने आव्हान केले. 

कन्हैयाकुमारच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते पंजाब असा "लॉंग मार्च' 15 जुलैपासून काढण्यात आला आहे. त्या रॅलीचे रविवारी नगरला आगमन झाले. त्यानिमित्त झालेल्या सभेत कन्हैयाकुमारने सरकारवर जोरदार टीका केली. 
तो म्हणाला, "सरकारने धर्म व जातीच्या नावाखाली लोकांचे जगणे अवघड केले आहे. "अच्छे दिन' तर आले नाहीतच, उलट लोकांचे पैसे काढून घेतले. काळा पैसा किती जमा झाला, हे मात्र सांगितले जात नाही. देशात लोकांवर काही वस्तू लादल्या जात आहेत आणि असलेल्या वस्तू जबरदस्तीने काढून घेतल्या जात आहेत. सांप्रदायिक शक्तीने लोकांचे जगणे अवघड केले आहे. पंतप्रधान सूट बदलल्याप्रमाणे देश बदलत आहेत; मात्र हा देश जेवढा त्यांचा, तेवढा आमचाही आहे. हा देश सावरकरांसोबत आंबेडकरांचाही आहे. देशासाठी जे शहीद झाले, त्यात किती लोक जातीयवादी संघटनांतील आहेत? भगवा झेंडा संत तुकारामाचा अहिंसेचा झेंडा आहे. त्याचा हे लोक हिंसेसाठी वापर करत आहेत.'' 

गांधीजींच्या हत्तेत सहभाग घेणारे गांधीवादी कसे ? 
कन्हैयाकुमार म्हणाला, "महात्मा गांधी यांच्या हत्येत सहभाग असणारे लोक गांधीवादी कसे काय असतील? त्यांनी कितीही गांधीजींचे नाव घेतले, तरी ते गांधीवादी कसे होऊ शकतात. धर्मवाद, जातीयवाद, गुलामीपासून आम्हाला आझादी पाहिजे. काश्‍मीरमध्ये सामान्य माणसाला जाण्यास परवानगी नाही. त्यामुळे तेथे "लॉंग मार्च' नेता येणार नाही. सत्ताधारी संविधानावर हल्ला करीत आहेत. शिक्षणव्यवस्था खिळखिळी करण्याचा त्यांचा डाव आहे; पण हा डाव आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही.''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT