MLA Shivendraraje Bhosale
MLA Shivendraraje Bhosale  
राज्य

ईडीच्या प्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी दिले हे उत्तर....

सरकारनामा ब्यूरो

सातारा : जरंडेश्वर कारखान्याला केलेल्या कर्जपुरवठ्याची माहिती जिल्हा बँकेकडून ईडीने मागविली आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत विचारली जाईल, यामुळे राष्ट्रवादीचा जिल्ह्यातील एकही संचालक जिल्हा बँकेच्या पत्रकार परिषदेस उपस्थित राहिला नाही. सर्व काही आमदार शिवेंद्रसिंहराजेंवर ढकलून रिकामे झाले. भाजप ईडीची चौकशी लावते का, या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजेंनी अधिक बोलणे टाळत याबाबत भाजप व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना विचारा, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. NCP leaders turned their backs on the District Bank award

सातारा जिल्हा बँकेला आज नाबार्डने पश्चिम महाराष्ट्रातील उत्कृष्ट कार्यक्षमते बद्दल 'बेस्ट परफॉर्मन्स' बँक म्हणून विशेष पुरस्काराने गौरविले. हा कार्यक्रम दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते झाला. यावेळी साताऱ्यातून ऑनलाइन पध्दतीने बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे तसेच संचालक शिवरूपराजे खर्डेकर, प्रकाश बडेकर, राजेश पाटील वाठारकर, अर्जूनराव खाडे, दत्तानाना ढमाळ, संचालिका सुरेखा पाटील, कांचन साळुंखे उपस्थित होते.

पत्रकार परिषद सुरू होत असतानाच बँकेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने पालकमंत्र्यांनी सह्याद्री कारखान्यावर बोलावले आहे, असे सांगून निघून गेले. त्यानंतर पत्रकार परिषदेत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ईडीच्या नोटीसी विषयीची नेमकी माहिती दिली. ते म्हणाले, बँकेला ईडीची नोटीस आलेली नाही. तर जरंडेश्वर कारखान्याला बँकेने कर्जपुरवठा केलेल्याबद्दलची माहिती मागवली आहे.

त्यामुळे बँकेविषयी ठेवीदार व खातेदारांनी गैरसमज करून घेऊ नये. जरंडेश्वर कारखान्याला निकषात राहून कर्ज पुरवठा केलेला आहे. खासगी कारखाना म्हणून निकषात कुठेही जरंडेश्वरला डावलले नाही. बँकेने सहकारी पाच व खासगी दोन कारखान्यांना कर्जपुरवठा केलेला आहे. प्रचलित धोरणाप्रमाणे व रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या निकषाप्रमाणे कारखान्यांना कर्ज दिलेले आहे. बँकेकडे जरंडेश्वर कारखान्याची ४७२ कोटींची मुल्यांकन असलेली मालमत्ता ३० कोटींची साखर तारण आहे. त्यापैकी साखरेवर दिलेल्या कर्जाची कारखान्याने १५ कोटींची एकरकमी एकरकमी परतफेड केलेली आहे. 

भाजप ईडीचा गैरवापर करतेय असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे यांनी केला आहे, याविषयी विचारले असता आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, बँकेत पक्ष म्हणून कोणीही काम करत नाही. राजकिय विषय बाजूला ठेऊन सहकारी बँक म्हणून आम्ही सर्वजण एकत्र काम करतो. मी राष्ट्रवादीतून आमदार झाल्यानंतर बँकेचा अध्यक्ष झालेलो आहे. त्यानंतर मी भाजपमध्ये गेलेलो आहे. ईडीच्या विषयी तुम्ही राष्ट्रवादी व भाजपच्या प्रमुख नेत्यांना विचारा, मी अधिक काहीही सांगू शकत नाही, असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले. 

ईडीच्या चौकशीविषयी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारले जातील, यामुळे बँकेच्या आजच्या पुरस्कार मिळालेल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही दिग्गज संचालक बँकेच्या पत्रकार परिषदेस उपस्थित नव्हता. बँकेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील मानेही पत्रकार परिषद सुरू होत असतानाच पालकमंत्र्यांनी सह्याद्री कारखान्यावर बोलवले आहे, असे सांगून निघून गेले. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी अध्यक्ष म्हणून एकट्याने पत्रकारांना ईडीविषयीची माहिती दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT