Satara Wine Shop Issues
Satara Wine Shop Issues 
राज्य

Video : महसूलासाठी मद्य संस्कृती पसरवू नका : डॉ. हमीद दाभोलकर

सरकारनामा ब्यूरो

सातारा : दारू ही जीवनावश्यक वस्तू नसल्याने ती घरपोच देण्याची पध्दत तातडीने बंद करावी. पुणे, मुंबई जिल्ह्यांप्रमाणे सातारा जिल्ह्यात घरपोच दारूची सुविधा सुरू करू नये. या चुकीच्या पध्दतीला समस्त सातारकरांनी विरोध करायला हवा. शासनाने मद्याची ही संस्कृती महसूलाच्या मोहापायी समाजात पसरवू नये, असा सल्ला परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी शासनास दिला आहे. 


सातारा जिल्ह्यात आजपासून जिल्हा प्रशासनाने दाररूची दुकाने सुरू केली. त्यामुळे दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जिल्ह्यात दारूसाठी रांगा लागल्याचे प्रथमच पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर परिवर्तन व व्यसनमुक्ती संस्थेचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

डॉ. दाभोलकर म्हणाले, राज्य शासनाने पुणे, मुंबई सारख्या जिल्ह्यात घरपोच दारू पोचविण्याची सुविधा केलेली आहे. राज्य शासनाला मी विनंती करतो की घरपोच दारू देण्याची पध्दत तातडीने बंद करावी. दारू ही जीवनावशयक वस्तू नाही. जरी सर्वजण सोशल डिस्टसिंगचे पालन करून खरेदी करत असले तरी दारूच्या बाटलीसोबत कौटूंबिक हिंसाचाराच्या घटनांही वाढत असतात. लॉकडाऊनच्या काळात अशा घटना वाढत असल्याचे दिसत आहे. दारू ही मानवी मेंदूवरील नियंत्रण कमी करणारे पेय आहे. त्यामुळे घरपोच दारू विक्रीच्या या चुकीच्या पध्दतीला आपण सर्वांनी त्याला विरोध करायला हवा. 

दारू पिण्याचे व्यक्ती स्वातंत्र्य हे सर्वांना आहे. पण दारू बंदी करावी का, नाही याविषयी मतमतांतर आहेत. महाराष्ट्र शासनाची अर्थव्यवस्था जर दारूवर अवलंबून असूल तर हे या शासनाला अजिबात भूषणावह नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, आंबेडकर व महात्मा फुले, गांधीजी यांचे नाव घेणारी मंडळी आज सत्तेत असताना दारूला सारख्या व्यसनाला कडाडून विरोध केला पाहिजे. मुळात शासनाने दारूच्या महसूलातील उत्पन्न टप्प्याटप्प्याने कमी करावे.

गुजरात आणि बिहार सारखी राज्ये दारूच्या महसूली उत्पन्नाशिवाय चालू शकतात. मग महाराष्ट्र का चालू शकत नाही, असा प्रश्न करून डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले,   सामाजिक पातळीवर व्यसनमुक्तीच्या सुविधा शासनाने मोठ्याप्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कल्याणकारी राज्याच्या शासनाने आपल्या जबाबदारीतून पळ काढू नये. मद्याची ही संस्कृती महसूलाच्या मोहापायी समाजात पसरवू नये, असे आवाहन डॉ. दाभोलकर यांनी शासनाला केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT