imtiyaz jalil and khaire news aurangabad
imtiyaz jalil and khaire news aurangabad 
राज्य

एकमेकांचे विरोधक, पण या मुद्यावर झाले एकमत..

जगदीश पानसरे

औरंगाबाद : एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील व शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. पण या दोन आजी-माजी खासदारांमध्ये एका मुद्यावर मात्र एकमत असल्याचे स्पष्ट झाले आहे. धार्मिक स्थळे आता खुली करा, अशी मागणी या दोघांनीही केली आहे. चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून हिंदूंच्या पवित्र श्रावण महिन्यामध्ये मंदिरे खुली करा, तर बकरी ईदची नमाज अदा करता यावी यासाठी मशिदी खुल्या करा, अशी मागणी इमतियाज जलील यांनी प्रशासनाकडे केली आहे.

कोरोना या जागतिक महामारीमुळे देश, राज्य आणि औरंगाबाद जिल्हा गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये आहे.  औरंगाबाद जिल्ह्यात तर कोरोना रुग्णांची संख्या अकरा हजारांच्या वर गेली आहे.  तर बाधितांच्या आकडाही साडेचारशेच्या आसपास पोचला आहे.  राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन म्हणत लॉकडाऊनमध्ये शीतलता देण्याचा प्रयोग केला, मात्र औद्योगिक वसाहतींमध्ये दळणवळण वाढले आणि पुन्हा कोरोनाचा स्फोट झाला.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आणि  त्याचीही मुदत संपली. आता पुन्हा लॉकडाउन नको,अशी भूमिका घेत सर्वांनीच कोरोनासोबत जगायला शिका असे आवाहन केले.  एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज आणि कुर्बानीसाठी मुस्लिम समाजाला सवलत द्या, अशी मागणी करत राज्य सरकारने बकरी ईदसाठी लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे शक्य नसल्याचे सांगितले होते.

पोलीस प्रशासनाकडे यासंदर्भात पाठपुरावाही सुरू केला होता. परंतु महापालिकेचे प्रशासक यांनी बकरी ईद घरात साजरी करा, राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करा,असे आदेश देत नियमांमध्ये बदल  करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे बकरी ईदच्या वाद आणखी चिघळण्याची शक्यता  आहे. दरम्यान इम्तियाज जलील यांनी उलेमा आणि मौलवींच्या बैठकीत आता मशिदीसह हिंदुंची मंदिर, चर्च व इतर धार्मिक स्थळे देखील खुली करावी अशी मागणी केली. 

बकरी ईद नंतर हिंदूंचा सर्वात मोठा गणपती उत्सव आणि इतर सण देखील एकापाठोपाठ येणार आहेत. त्यामुळे आता लोकांना आपापल्या धार्मिक रितीरिवाजानुसार प्रार्थना करण्याची मुभा द्यावी असा सूर इम्तियाज जलील यांनी लावला होता.

खैरे यांचीही तीच भूमिका

शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील इमतियाज जलील यांच्याशी मिळतीजुळती भूमिका घेतल्याचे दिसून आले. चंद्रकांत खैरे हे धार्मिक वृत्तीचे आणि महादेवाची उपासना करणारे कट्टर शिवभक्त म्हणून ओळखले जातात. श्रावण महिना सुरू झाल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेली शहर व जिल्ह्यासह राज्यातील शिवमंदिरे तसेच इतर देवांची मंदिरे देखील पूजाअर्चेसाठी खुली करावी अशी मागणी खैरे यांनी लावून धरली आहे. 

ज्या ब्रह्मवृंदाचा मंदिरातील धार्मिक विधीवर उदरनिर्वाह आहे किंवा पूजाअर्चेसाठी लागणारे साहित्य विक्री करून जे आपल्या संसाराचा गाडा चालवतात त्यांना दिलासा आणि आधार मिळावा या भूमिकेतून खैरे यांनी ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली आहे.

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून चंद्रकांत खैरे व इम्तियाज जलील यांच्यात अनेक मुद्द्यावरून  खटके उडाले आहेत. अगदी इम्तियाज जलील खासदार म्हणून निवडून आल्यानंतर शहरातील वातावरण बिघडले, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी अनेकदा केला.

तर त्याला 'पंचवीस वर्ष खासदार म्हणून तुम्ही जिल्ह्याचा काय विकास केला?अशा शब्दात इमतियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिल्याचे आपण पाहिले.  मात्र कोरोनाच्या संकटानंतर धार्मिक स्थळे खुले करण्याच्या या एका मुद्यावर मात्र नेहमीच परस्परविरोधी भूमिका घेणाऱ्या जिल्ह्यातील या दोन आजी-माजी खासदारांमध्ये एकमत झाल्याचे पहायला मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT