Pishor Grampanchyat Election news aurangabad
Pishor Grampanchyat Election news aurangabad 
राज्य

हर्षवर्धन जाधव यांच्यावर मात करत संजना जाधव गटाने पटकावले उपसरपंच पद..

संजय जाधव

औरंगाबाद ः नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कन्नड तालुक्यातील पिशोर ग्रामपंचायतीमध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव  व संजना जाधव यांचे पॅनल एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. सदस्य निवडीत हर्षवर्धन यांच्या पॅनलचे चार तर संजना जाधव यांच्या पॅनलचे केवळ दोन सदस्य विजयी झाले होते. मात्र आज झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडीत संजना जाधव यांच्या गटाची सरशी होऊन बाळासाहेब जाधव हे उपसरपंच तर सरला डहाके या सरपंच पदावर विराजमान झाल्या आहेत. दोन सदस्य आलेले असतांना संजना जाधव गटाने उपसरपंच पद पटाकवत हर्षवर्धन जाधव गटाला दणका दिल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

कधी नव्हे ते पिशोर ग्रामपंचायतीची निवडणूक यंदा चर्चेत आली होती. लोकसभा,विधानसाभा अशा सलग दोन निवडणुकीतील पराभव, कौटुंबिक वाद, आरोप-प्रत्यारोप आणि निवडणुकीच्या दरम्यानच पुणे येथे एका दाम्पत्यांला मारहाण केल्याप्रकरणी दाखल झालेला गुन्हा आणि अटक यामुळे हर्षवर्धन जाधव अधिकच अडचणीत सापडले होते. आमदारकी गेल्यानंतर किमान गावाचा कारभार तरी आपल्या हाती राहावा, यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी तुरूंगातून प्रयत्न केले. संपुर्ण निवडणूकीची जबाबदारी मुलगा आदित्य याच्यावर सोपवण्यात आली होती. 

ग्रामपंचायत निवडणुकीची निकाल लागला तेव्हा हर्षवर्धन जाधव यांच्या गटाचे फक्त चार सदस्य निवडून आले. तर संजना जाधव यांच्या पॅनलला देखील फारशी चमक दाखवता आली नाही, केवळ दोन सदस्य निवडून आल्याने तेव्हा हर्षवर्धन जाधव यांची त्यांच्यावर सरशी झाली होती. पण निवडणुकीत कमी सदस्य निवडून आले असले तरी संजना जाधव यांच्या गटाचे बाळासाहेब जाधव यांनी उपसरपंच पद मिळवत हर्षवर्धन जाधव यांना झटका दिला.

पुण्यातील मारहाण प्रकरणात गेली दीड-दोन महिने अटकेत असलेल्या हर्षवर्धन जाधव यांचा नुकताच जामीन झाला. यासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. त्यामुळे पिशोरच्या सरपंच निवडीत जाधव काही चमत्कार घडवतात का? याकडे देखील अनेकांचे लक्ष लागले होते. पण असा कुठलाही चमत्कार तर घडलाच नाही उलट संजना जाधव गटाकडे उपसरपंच पद गेल्याने हर्षवर्धन बॅकफुटवर गेले.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या डहाके गटाचे सर्वाधिक सात सदस्य निवडून आल्यामुळे सरला डहाके यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडली. एकूण १७ सदस्य असलेल्या पिशोर ग्रामपंचायतीमध्ये डहाके यांच्या पॅनलला ७,  हर्षवर्धन जाधव गट ४, संंजना जाधव २, मोकासे गट-३, तर एक अपक्ष सदस्य निवडून आला होता. सरपंच पदाच्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव गटाचे दोन सदस्य फुटले हे देखील विशेष. पिशोरमध्ये पती  विरुध्द पत्नी आणि आई- विरोधा मुलाने पॅनल उभे केल्याच्या चर्चेमुळे पिशोर ग्रामपंचायतीची राज्यभरात चर्चा झाली होती.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT