Pimpri Chinchwad Municipal Corporation: Shatrughan Kate and Ravi Landage vie for the post of Standing Committee Chairman
Pimpri Chinchwad Municipal Corporation: Shatrughan Kate and Ravi Landage vie for the post of Standing Committee Chairman 
राज्य

पिंपरी चिंचवड महापालिका : स्थायी समिती अध्यक्षपदासाठी लांडगे, काटेंत काट्याची टक्कर

उत्तम कुटे

पिंपरी : आशियातील श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे शेवटच्या वर्षासाठीचे निम्मे कारभारी निवडले गेल्यानंतर आता अध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. ते शहराचे कारभारी आमदार महेशदादांच्या भोसरीकडे कायम राहते की दुसरे कारभारी आमदार लक्ष्मणभाऊच्या चिंचवडकडे जाते, याकडे लक्ष लागले आहे. त्यासाठी गेल्या चार वर्षात एकही पद न मिळालेले चिंचवडमधील शत्रूघ्न काटे आणि भोसरीतील रवी लांडगे यांची नावे चर्चेत आहेत. 

एक, मात्र नक्की की वर्षभरावर आलेल्या पालिका निवडणुकीच्या तोंडावर ही निवड करताना भाजपला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. कारण गेल्या चार वर्षात एकही पद न मिळाल्याने अनेक नगरसेवक नाराज आहेत. तर, काहीजण पक्षच सोडण्याच्या तयारीत असल्याची मोठी चर्चा आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्षांतराच्या तयारीत असलेल्यांची नाराजी दूर करावी लागणार असून दुसरीकडे एकनिष्ठ जुन्या समर्थकांचाही विचार करावा लागणार आहे. 

दादा आणि भाऊ समर्थकांत समसमान पद वाटपाचा फॉर्म्यूला कायम ठेवला, तर मात्र स्थायी समिती अध्यक्षपद हे भोसरीकडे जाऊ शकते. तसे झाले, तर रवी लांडगे यांचे पारडे जड होईल. कारण सध्या महापौरपदी चिंचवडमधील भाऊ समर्थक आहेत. एकूणच पदे कमी आणि दावेदारी अधिक यामुळे पालिकेत गेल्या चार वर्षात विशेष करून या दोन पदांचा फिरता रंगमंच झालेला आहे.

लांडगे हे बिनविरोध निवडून आलेले असून त्यांना आतापर्यंत एकही पद मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी दोन भाजप नगरसेवकांसह अजित पवार यांची पुण्यात भेट घेताच मोठा धुरळा उडाला होता. दुसरीकडे भाऊ समर्थक काटेंनाही गेल्या चार वर्षात पद देण्यात आलेले नाही. ते, तर महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष अशा दोन्ही पदांसाठी दावेदार होते. त्यामुळे आता शेवटच्या वर्षात पालिकेच्या खजिन्याची चावी, तरी त्यांना मिळेल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT