राज्य

लातूरमधील राजकीय वातावरण तापले, कॉंग्रेस, शिवसेनेचे " पोस्टर वॉर' सुरू

सुशांत सांगवे

लातूर : ऑक्‍टोबर हिटमुळे लातूरातील वातावरण आधीच तापलेले आहे. आता दिग्गज नेत्यांच्या सभांमुळे शहरातील राजकीय वातावरणही तापायला सुरवात झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेऊन फडणवीस सरकारवर शाब्दीक आसूड ओढले. त्यानंतर आता कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेते सरकारच्या विरोधात मैदानात उतरत आहेत. मात्र, या राजकीय घडामोडींबाबत भारतीय जनता पक्षाने सध्या मौन बाळगले असले तरी आगामी निवडणूकीचा शहरातील माहोल रंगायला सुरवात झाल्याचे दिसत आहे. 

शिवसेनेच्या वतीने गटप्रमुखांचा मेळावा लातूरमध्ये मंगळवारी (ता. 23) आयोजित करण्यात आला होता. यासाठी ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. यानिमित्ताने अनेक महिन्यांनी त्यांचे लातूरात आगमन झाले. कार्यकर्त्यांनीही "आला रे आला, शिवसेनाचा वाघ आला,' अशा घोषणा देत आणि फटाक्‍यांची आतषबाजी करत त्यांचे जोरदार स्वागत केले. शहरात सगळीकडे पक्षाच्या कमानी, फ्लेक्‍स उभारून शहरातील वातावरण भगवेमय करण्यात आले. या वेळी ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरवातच "आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार आहे,' अशा शब्दांत केली. त्यांनी सभेत दहा-पंधरा मिनिटेच संवाद साधला असला तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा ठरला. निवडणूकीच्या तयारीला लागा, अशा सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. 

ठाकरे यांच्यानंतर आता कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा उद्या (ता.24 ) लातूरात येणार आहे. या यात्रेत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकुरकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख, प्रणिती शिंदे असे अनेक बडे नेते सहभागी होणार आहेत. ते लातूरकरांशी संवादही साधणार आहेत. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू केली आहे. सोनिया गांधी, राहूल गांधी यांच्यासह राज्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांचे छायाचित्र असलेले बॅनर शहरात जोगाजागी उभारले आहेत. "नको असली हुकूमशाही, शाबूत ठेवूया लोकशाही,' "सिलेंडरचे दर असेच वाढणार, पून्हा चुल पेटवावी लागणार' अशा घोषणा बॅनरच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. 

वेगवेगळ्या उद्‌घाटन सोहळ्यांच्या आणि विकासकामांच्या शुभारंभाच्या निमित्ताने भाजपची पोस्टरबाजी गेले काही महिने शहरात सुरू होती. आता नेत्यांच्या सभांच्या निमित्ताने कॉंग्रेस आणि शिवसेनेची पोस्टरबाजीही लातूरकरांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT