नाशिक : वाइनचा अबकारी विभागाऐवजी कृषी प्रक्रिया उद्योगात सामावून घ्यावे. तसेच मद्याच्या दुकानारील वाइन ही अक्षरे हटवण्यात यावीत, अशी मागणी किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी केली आहे. श्री. पोहरे यांनी याबाबतची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. नाशिकमध्ये आले असताना श्री. पोहरे यांनी ही माहिती दिली.
श्री. पोहरे म्हणाले, की समाजात मद्याला प्रतिष्ठा नसल्याने ते निषिद्ध आहे. त्यामुळे इंग्रज काळात देशात मद्याच्या दुकानांसाठी वाइन शॉप ही शक्कल लढवण्यात आली होती. या नावाने देशभर मद्याची दुकाने सुरू झाली आहेत. स्वातंत्र्यानंतरही त्यांचा समावेश अबकारी विभागातंर्गत आहे. पण वाइन हे पूर्णपणे कृषी उत्पादन आहे. फळांचा शुद्ध केलेला बाटली बंद उत्कृष्ट रस याव्यतिरिक्त वाइनची दुसरी व्याख्या करता येऊ शकत नाही. वाइन हे "हेल्थ ड्रिंक' आहे. मात्र मद्याच्या दुकानांना "वाइन शॉप' असा शब्दच्छल करत गोंडस नाव दिल्यामुळे वाइनबद्दल समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत. वाइन शॉप नाव असलेल्या दुकानांमध्ये झालेल्या वाइन आणि लिकर यांच्या विक्रीच्या आधारे वस्तुस्थिती समोर येते.
जगात अनेक देशात घरोघरी गृहिणी विविध फळांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या वाइन बनवतात. जांभूळ, डाळींब, पेरू, गाजर, काकडी, मुळा, केळी, मोसंबी, संत्रा, चिकू, सीताफळ, महुवा, टोमॅटो, सफरचंद, द्राक्षे, किवी, आंबा, तांदूळ, अंजीर, जिंजर आदींच्या शंभर प्रकारच्या वाइनचा त्यात समावेश आहे. देशात मात्र "वाइन शॉप'च्या आवरणाखाली मद्याच्या विक्रीच्या धोरणामुळे वाइन संबंधी गैरसमज पसरले आहेत, असे सांगून श्री. पोहरे म्हणाले, की देशात वाइन पेय अबकारी विभागातंर्गत असल्याने त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांवर अनेक बंधने आली आहेत. परिणामी, कृषी आधारित उद्योगाच्या विकासाचा संकोच झाला आहे. देशात फळांचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर घेतले जाते. पण जाचक अटींमुळे आणि गैरसमज असल्याने फळांवर आधारित उद्योगात शिरण्यास शेतकरी धजावत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत.
वाइनसाठी सवलती अन् अनुदान मिळावे
वाइनला कृषी उत्पादनाचा दर्जा देऊन विविध सवलती आणि अनुदान मिळावे. वाइन उद्योग खादी ग्रामोद्योगतंर्गत कुटीर उद्योग, "कॉटेज इंडस्ट्रीज' म्हणून भरभराटीला आणावा आणि शेतकऱ्यांना समृद्ध करावे. नियमात बदल करुन वाइनला "ऍग्री हेल्थ ड्रींक'चा दर्जा देण्यात यावा, अशी किसान ब्रिगेडची मागणी आहे. मुळातच, एकीकडे प्रकृतीला हानीकारक अशी अनेक शीतपेय बाजारात खुलेआम प्रतीष्ठेच्या नावाखाली विकल्या जात आहे. पण शुद्ध कृषी उत्पादन असलेल्या आरोग्यवर्धक वाइनचा वनवास आहे. दुसरीकडे साखरेच्या औद्योगिक मळीपासून तयार केलेली आणि फळांचा दूरुनही संबंध नसलेली आणि मानवी आरोग्यास अत्यंत घातक असे मद्य "संत्रा', "मोसंबी', "नारिंगी' या नावाने सरकारच्या आशीर्वादाने खुलेआम विकल्या जात आहे. हे एक आश्चर्य आहे, असेही श्री. पोहरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.