213Saibaba_Shirdi_2H.jpg
213Saibaba_Shirdi_2H.jpg 
राज्य

घोषणांचा पाऊस अन्‌ अंमलबजावणीचा दुष्काळ : शिर्डीचे साईसंस्थानची अवस्था

सतीश वैजापूरकर

शिर्डी : अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या; मात्र कधीही प्रत्यक्षात न आलेल्या कोट्यवधी रुपये खर्चाच्या पोकळ घोषणा आणि साईसंस्थानचे नाते फार जवळचे. आता साईसंस्थानला देशी पाच हजार गायींच्या संगोपनातून वर्षभरात पाच कोटी रुपये किमतीचे दूध आणि अठ्ठावीस कोटी रुपये किमतीचे गावरान तूप यांची निर्मिती करायची आहे, तसेच मोठे कॅन्सर उपचार रुग्णालयदेखील सुरू करायचे आहे. या दोन मोठ्या घोषणा साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी नुकत्याच केल्या. 

या घोषणा प्रत्यक्षात येतात की हवेत विरतात, हे पाहावे लागेल. बगाटे केवळ तीन वर्षांसाठी आले आहेत. नवे मंडळ येईपर्यंत त्यांना उच्च न्यायालयाच्या परवानगीने कारभार करायचा आहे. एवढ्या कमी कालावधीत एवढे मोठे प्रकल्प साकारण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. साईसंस्थानचा कारभार पाहण्यासाठी चार वर्षांपूर्वी आलेल्या पहिल्या सनदी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी केंद्र व राज्य सरकारकडून साईसमाधी शताब्दी वर्षानिमित्त तब्बल तीन हजार कोटी रुपये निधी आणण्याचे मोठे काम सुरू केले. दोन वर्षे राबून त्यांनी संस्थानच्या खर्चाने प्रस्ताव तयार केले. मात्र, साईसमाधी शताब्दी वर्षाची सांगता होऊन तीन वर्षे लोटली तरी एक रुपयाही निधी मिळाला नाही. 

याच काळात संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांना भाविकांच्या देणगीतून राज्य सरकारला तब्बल शंभर रुग्णवाहिका भेट द्यायच्या होत्या. "फूट एनर्जी' हा अचाट प्रकल्प राबवून संस्थानचा विजेचा खर्च वाचवायचा होता. "साईसृष्टी' आणि "तारांगण' तयार करायचे होते. ते वारंवार या प्रकल्पांच्या घोषणा करून वृत्तपत्रांत मथळे मिळवायचे. यातील एकही प्रकल्प अस्तित्वात आला नाही, कारण तीन वर्षांच्या कालावधीत हे प्रकल्प साकारणे शक्‍य नव्हते. शिवाय, फूट एनर्जी आणि रुग्णवाहिकांचे वाटप हे प्रकल्प व्यवहार्यदेखील नव्हते. केवळ पोकळ घोषणा करण्यात धन्यता मानली जात होती. 

आता पाच हजार गायींचे संगोपन, त्यासाठी आवश्‍यक असणारी हिरवी वैरण, पशुखाद्य, कुशल मनुष्यबळ, एवढ्या मोठ्या संख्येने दुधाळ गायींची उपलब्धता यांचा विचार केला, तर हा प्रकल्प कितपत व्यवहार्य ठरेल, याबाबत जाणकारांना शंका आहे. संस्थानला हे शक्‍य होईल का, असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. साई संस्थान हे महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या संस्थानकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.

आधी जुन्या रुग्णालयांमध्ये सुधारणा हव्यात 

कॅन्सर उपचार रुग्णालयाची उभारणी ही तर स्वागतार्ह घोषणा आहे. मात्र, संस्थानच्या दोन्ही रुग्णालयांची दुरवस्था, औषधांचा व डॉक्‍टरांचा तुटवडा, कमी दरात उपचार होतात म्हणून दूरवरून येणाऱ्या गरजू रुग्णांची वाढती संख्या, अपुऱ्या व्यवस्थेअभावी त्यांचे होणार हाल, डॉक्‍टरांच्या इन्सेंटिव्हचा प्रश्न, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अडचणी, तेथे तयार झालेली कंपूशाही, उतू चाललेले अंतर्गत राजकारण यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT