राज्य

अयोध्येत जाऊन मोदींना विचारणार, राम मंदिर कधी बांधणार - उध्दव ठाकरे

जगदीश पानसरे

औरंगाबाद : राम मंदिराचा मुद्दा मी मुद्दाम घेतला आहे, हिंदुत्व आणि राम मंदिर बांधण्याचे आश्‍वासन देऊन तुम्ही सत्तेवर आलात. मग आता राम मंदिर जुमला आहे का ? असा रोखठोक सवाल करत " मी अयोध्येत जाऊन पंतप्रधान मोदींना राम मंदिर कधी बांधणार याचा जाब विचारणार असल्याचा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज दिला. 

औरंगाबाद येथील शिवसेना गटप्रमुख व लोकप्रतिनिधींच्या मेळाव्यात उध्दव ठाकरे बोलत होते. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या सोबतच प्रभू श्रीरामचंद्राचा भव्य पुतळा ठेवण्यात आला होता. जय महाराष्ट्र आणि जय श्रीरामच्या घोषणा शिवसैनिक देत होते. हा संदर्भ देत उध्दव ठाकरे यांनी भाजपच्या अच्छे दिनचा समाचार घेतला. ते म्हणाले, अच्छे दिन आले नाहीत, ते येतील तेव्हा येतील, पण पुन्हा जुने दिवस आल्याचे पाहून मला अभिमान वाटत आहे. पंचवीस वर्षापासून हिंदुत्वाच्या मुद्यावरच आम्ही तुमच्या सोबत होतो. 

अयोध्येत राम जन्मभूमीवरचे मंदीर पाडून मशीद बांधली गेली हे तुम्हीच आम्हाला सांगितले. बाबरी मशीद पाडण्यासाठी शिवसैनिक अयोध्येत गेले होते, हजारो कारसेवकांच्या रक्ताने शरयू नदी लाल झाली. राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या नावावर तुम्ही मते मागितली आणि सत्तेवर आलात. मग राम मंदिराचे काय झाले? हे तुम्हाला विचारायचे नाही का? की निवडणुकी आधी दिलेल्या सगळ्याच जुमल्या प्रमाणे राम मंदीर हा देखील जुमला होता? हे विचारण्यासाठीच मी 25 नोव्हेंबरला अयोध्येत जातोय. सध्या असलेल्या राम मंदिराच्या जागेसमोर उभा राहूनच मी पंतप्रधान मोदींना "राम मंदिर केव्हा बांधणार' हे विचारणार असल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले. मंदिर हिंदुत्वासाठी की सत्तेसाठी? असा खोचक सवाल देखील ठाकरे यांनी यावेळी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT