7-12-digitization-cm
7-12-digitization-cm 
राज्य

 महसूल विभागाकडील अडीच कोटी कागदपत्रांचे  डिजिटायझेशन करणार - चंद्रकांत पाटील 

सरकारनामा

  "राज्यातील जमिनींच्या नकाशाच्या डिजिटायझेशनचे काम वेगाने सुरू आहे. महसूल विभागाकडे 150 वर्षापासूनच्या नोंदी आहेत. महसूल खात्यात असलेले सुमारे अडीच कोटी कागदपत्रेही डिजिटल स्वरुपात साठविण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे शासकीय व्यवहारामध्ये पारदर्शकता वाढणार आहे," असे महसूलमंत्री  चंद्रकांत पाटील यांनी सांगितले . 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत डिजिटल स्वाक्षरी असलेल्या  सातबारा उताराचे वाटप मुंबईत कामगार दिनानिमित्त मंगळवारी झाले . त्यावेळी चंद्रकांत दादा बोलत होते .  

महसूलमंत्री श्री. पाटील म्हणाले की, "शेतकऱ्यांना विनासायास सातबारा उतारा मिळावा, हे स्वप्न आता पूर्ण होत आले आहे. यासाठी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केला. डिजिटायझेशनमुळे जमिनीच्या नोंदीतील फेरफार करताना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. उर्वरित सातबारा उताऱ्यांचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार असून तोपर्यंत सध्या उपलब्ध असलेले डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे हे मोफत डाऊनलोड करता येणार आहेत. याचबरोबर  राज्यातील तलाठ्यांनी डिजिटायझेशनच्या कामासाठी मेहनत घेतली आहे."

प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव  प्रास्ताविकात  म्हणाले की," ऑनलाईन सातबारा फेरफारमध्ये लोकांना आपल्या नोंदी करण्याची सोय भविष्यात करून देण्यात येणार असून ई चावडीच्या माध्यमातून तलाठ्याचे सर्व दफ्तर ऑनलाईन करण्यात येणार आहे. सहा जिल्ह्यात सुरू असलेल्या जमिनीच्या नकाशाचे डिजिटायझेशनचे काम लवकरच उर्वरित 28 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे."

यावेळी मुख्य सचिव डी.के. जैन, विभागीय आयुक्त जगदीश पाटील, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम आदी उपस्थित होते. डिजिटल सातबारा प्रकल्पात काम केल्याबद्दल प्रधान सचिव श्री. श्रीवास्तव, उपसचिव संतोष भोगले, उपजिल्हाधिकारी मनोज रानडे, प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप, मयूर मिटकरी आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT