राज्य

सोलापूर महापालिकेत चौथ्यांदा महिलाराज

विजयकुमार सोनवणे

सोलापूर, ता. 13 ः महापौरपद इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव झाल्याने महापालिकेत पुन्हा महिलाराज येणार आहे. सलग चौथ्यांदा महापौरपद हे महिलेसाठी राखीव झाल्याने पुरुष नगरसेवकांना दहा वर्षांपासून महापौरपदापासून वंचित रहावे लागले.

आज बुधवारी दुपारी तीन वाजता मंत्रालयात महापौर आरक्षणाची सोडत काढण्यात आली. तीत सोलापूरचे महापौरपद हे इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव झाले. यापूर्वी अलका राठोड, प्रा. सुशीला आबुटे, विद्यमान शोभा बनशेट्टी महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. आता चौथ्यांदा हे पद महिलेसाठी राखीव झाले आहे. 

यंदाचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होईल या अंदाजाने अनेकांनी महापौरपदावर विराजमान होण्याचे स्वप्न बाळगले होते. मात्र त्या सर्वांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. या पदावर सध्या भाजपकडून श्रीकांचना यन्नम यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र भाजपमध्ये या प्रवर्गातील नगरसेविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारी निवडताना भाजपच्या नेतृत्वाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

यन्नम यांच्याशिवाय उपमहापौर शशीकला बत्तुल, राजश्री कणके, कल्पना कारभारी, राधिका पोसा, प्रतिभा मुदगल, अनिता कोंडी, मेनका राठोड, अश्विनी चव्हाण, मनिषा हुच्चे या 
नगरसेविका या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नेते कोणाला प्राधान्य देतात त्यावर महापौरपदाचा उमेदवार निश्चित होईल. सध्याच्या टर्ममध्ये सौ. यन्नम यांचा
अडीच वर्षांसाठी दावा होता. मात्र तो प्रत्यक्षात आला नाही. आता दावेदार वाढले आहेत. त्यामुळे महापौर निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत मिळाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT