Sarkarnama Banner
Sarkarnama Banner 
राज्य

ऊसतोड कामगाराचा मुलगा झालाच होता डॉक्टर, पण कोरोनासोबतची लढाई हरला...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : परभणी जिल्ह्याच्या एका छोट्याशा गावातील ऊसतोड कामगाराचा मुलगा. उराशी डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून होता. त्याच्या गरीब आईवडिलांनीही रात्रंदिवस काबाडकष्ट करून त्याच्या पंखांना बळ दिले. त्यांच्या गावातून झालेला तो पहिलाच डॉक्टर होता. पण अंतिम वर्षाचे शिक्षण घेत असताना एप्रिल महिन्यात परीक्षेच्या तयारीची लगबग सुरू असताना त्याला कोरोनाची लागण झाली. अन् त्यातच त्याचा मृत्यू झाला. राहुल विश्‍वनाथ पवार याचा मृत्यू त्याच्या कुटुंबीयांसह मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे हृदय पिळवटून गेला. 

२५ वर्षीय राहुल लातूरच्या एमआयटी मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता. हुशार आणि आपल्या पेशाशी प्रामाणिक होता. गरिबीच्या परिस्थितीशी दोन हात करीत शिकत असल्यामुळे डॉक्टर होऊन असंख्य रुग्णांची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून होता. विपरीत परिस्थितीशी लढा देत एमबीबीएसच्या अंतिम वर्षापर्यंत तर तो पोहोचला. पण कोरोनाशी झालेल्या लढाईत त्याचा पराभव झाला. कोरोनाने बाधित झाल्यानंतर औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. 

एमजीएम रुग्णालयात सुरुवातीला त्याने उपचारांना चांगला प्रतिसादही दिला. त्यातून तो बरा होत आहे, असे वाटत असतानाच त्याला म्युकरमायकोसीसचा संसर्ग झाला. यावेळी मात्र तो खचला. डॉक्टरांना त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तब्बल २० ते २५ दिवस त्याने मृत्यूशी निकराची झुंज दिली. पण अखेर मृत्यूने डाव साधला. म्युकरमायकोसिसचा संसर्ग अधिक बळावत गेल्याने अखेर गेल्या आठवड्यात बुधवारी त्याचा मृत्यू झाला. उत्तम डॉक्टर होऊ पाहणाऱ्या युवकाचा असा अंत झाल्याने त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही अश्रू आवरता आले नाही. त्याचे सहकारी तर धाय मोकलून रडले. 

सहकारी मित्रांनी केले आंदोलन
डॉ. राहुल पवार याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्याचे सहकारी, जे नागपुरातील मेयो रुग्णालयात इंटर्नशीप करीत आहेत, त्यांनी डॉ राहुल पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूचा शोक व्यक्त केला. तसेच त्याच्या कुटुंबीयांना विमा कवचाचा लाभ आणि अतिरिक्त मानधन मिळावे, अशी मागणी केली पूर्वीच केली होती. पण प्रशासनाने ही मागणी पूर्ण न केल्यामुळे त्यांना काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध केला. 
 Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT