3manoj_20kotkar1_3.png
3manoj_20kotkar1_3.png 
राज्य

नगर महापालिका ! स्थायीचे सभापती कोतकर उपोषणाला बसताच पथदिव्यांना मान्यता

सरकारनामा ब्युरो

नगर : महापालिकेच्या विद्युत विभागाला पूर्ण वेळ अभियंता मिळावा, तसेच शहरातील सर्व पथदिवे एलईडी करण्यासाठीचे साहित्य मिळावे, या मागणीसाठी महापालिका स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी आयुक्‍तांच्या दालनातच उपोषण केले. उपोषण करताच एलईडी पथदिवे बसविण्याचे काम सुरू होईल, असे आश्‍वासन महापालिका आयुक्‍तांनी दिले. 

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा काल झाली. तीत सभापती कोतकर यांनी शहरातील बंद पथदिव्यांबाबतचा प्रश्‍न उपस्थित केला असता, त्यावर उत्तर देण्यासाठी कोणीही जबाबदार अधिकारी नव्हते. याबाबत नाराजी व्यक्‍त करीत कोतकर यांनी महापालिका आयुक्‍तांच्या दालनात उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार काल कोतकर व संजय ढोणे हे महापालिका आयुक्‍तांच्या दालनात आले.

सभागृहनेते मनोज दुल्लम, प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, सतीश शिंदे, निखिल वारे त्यांच्यासमवेत होते. शहरातील पथदिवे बंद असल्याबाबत आयुक्‍तांकडे नाराजी व्यक्‍त करीत, त्यांनी उपोषण सुरू करीत असल्याचे जाहीर केले. 

शहरातील पथदिवे बंद असल्याने, रात्रीच्या वेळी रस्त्यांवर अंधार पसरलेला असतो. त्यातून अपघात, चोऱ्यांचे प्रकार होतात. शहरातील पथदिवे दुरूस्त करण्याच्या मागणीसाठी स्थायी समिती व महासभेने प्रस्ताव मंजूर केले. मात्र, महापालिकेकडे पथदिवे दुरुस्तीसाठीचे साहित्य उपलब्ध नाही. त्यात विद्युत विभागाला पूर्ण वेळ उपअभियंता नाही. 

शहरात 32 हजार स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याचे ठरले होते. हे काम बीओटी तत्त्वावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, उपअभियंताच नसल्याने आलेल्या निविदा उघडल्याच नाहीत. त्यामुळे पथदिव्यांचा प्रश्‍न तसाच मागे पडला. 

दरम्यान, महापालिका प्रशासनाने मनोज कोतकर यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्युत विभागाला पूर्ण वेळ उपअभियंता व पथदिवे साहित्याची मागणी कोतकर यांनी लावून धरली. अखेर सायंकाळी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मध्यस्थी केली. आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी नगररचना विभागातील वैभव जोशी यांच्याकडे विद्युत विभागाचा पदभार दिला. तसेच आगामी दोन-तीन दिवसांत निविदा उघडून पथदिवे बसविण्याचा कार्यारंभ आदेश देण्यात येईल, असा आदेश महापालिका प्रशासनाला दिला. त्यानंतर महापौर वाकळे यांच्या हस्ते पाणी घेऊन कोतकर यांनी उपोषण मागे घेतले. याकडे महाराष्ट्रातील महापालिकांचे लक्ष लागले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT