Abhay Bang-Vijay Wadettiwar
Abhay Bang-Vijay Wadettiwar 
राज्य

देशात दारूबंदी करण्याचा सल्ला मोदींनाच देऊन टाका ना : विजय वडेट्टीवार 

प्रमोद काकडे

चंद्रपूर : टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात दारू विक्रीची दुकान उघडण्याचा निर्णय अतर्क्‍य आहे, अशी टीका डॉ. अभय बंग यांनी राज्यशासनावर केली होती. या टीकेचा बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती आहे. त्यामुळे डॉ. बंग यांनी आता थेट पंतप्रधानांना सल्ला देवून देशातच दारूबंद करावी. त्यामुळे हा विषयच कायमचा बंद होईल. त्यामुळे वारंवार या विषयावर बोलण्याचा त्यांचा त्रास वाचेल, असा टोला वडेट्टीवार यांनी डॉ. बंग यांना हाणला. 

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचा आढावा घेण्यासाठी गठित समीतीवर यापूर्वी डॉ. बंग यांनी टीका केली होती. तेव्हाही वडेट्टीवार यांनी त्यांना प्रत्त्युत्तर दिले होते. आता पुन्हा दोघे समोरासमोर आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात टाळेबंदी सुरू आहे. टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात काही शिथिलता देण्यात आली. त्यात केंद्राने राज्यातील दारू दुकाने सुरू करायला हिरवी झेंडी दाखविली. महाराष्ट्र शासनाने काही जिल्ह्यात दारूविक्रीला परवानगी दिली आहे. यावर डॉ. बंग यांनी टीका केली. दारूदुकान सुरू केल्यामुळे घरपोच कोरोना पोचविण्याची व्यवस्था झाली आहे. हा अतर्क्‍य निर्णय आहे, असे ते म्हणाले. यावर आता वडेट्टीवार यांनी टीकास्त्र सोडले. 

वडेट्टीवार म्हणाले, डॉ. बंग यांचे सामाजिक कार्य फार मोठे आहे. त्यांसंदर्भात आवश्‍यकता पडेल तेव्हा बोलणारच आहे, असा अप्रत्यक्ष इशारा देत देशातच दारूबंदी करण्याचा सल्ला त्यांनी पंतप्रधान मोदींना द्यावा. त्यामुळे ही समस्याच कायमच निकाली निघेल आणि त्यांना वारंवार यावर बोलावे लागणार नाही. सोबतच महसूल कसा वाढवावा, याचे मार्गदर्शन देखील त्यांनी पंतप्रधांना करावे, असा खोचक सल्लाही डॉ. बग यांना दिला. 
डॉ. बंग यांच्या म्हणण्यानुसार, दारूमुळे दरवर्षी पाच लाख लोकांचा मुत्यू होतो. ही आकडेवारी आली कुठून. जी गोष्ट सरकारला माहित नाही. त्या गोष्टीची खडानखडा माहिती बंग यांना असते, असा चिमटाही वडेट्टीवारांनी काढला. 

सरकार चालविण्यासाठी पैशाची गरज असते. त्यांची एनजीओ चालविण्यासाठी सुद्धा पैसा लागतो. त्यांचा मुलगा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कक्षात बसायचा. तेव्हाच डॉ. बंग यांनी राज्यातील दारूबंदी करण्याचा सल्ला फडणवीस यांना द्यायला हवा होता. त्यांचे अनंत उपकार महाराष्ट्रावर झाले असते, असा टोला वडेट्टीवार यांनी डॉ. बंग यांना लावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT