Tukaram Mundhe
Tukaram Mundhe 
राज्य

वेतन, स्वच्छता, विजेसाठी लागणारे 80 कोटी जुळविण्याचेच लक्ष्य : तुकाराम मुंढे 

सरकारनामा ब्युरो

नागपूर : महानगरपालिकेचा आर्थिक गाडा जोपर्यंत रुळावर येत नाही, तोपर्यंत विकास कामांवर परिणाम होईल. पालिकेला वेतन, निवृत्तीवेतन, स्वच्छता, वीज, कचऱ्याची विल्हेवाट यासाठी दर महिन्याला 70 ते 80 कोटींचा खर्च येत आहे. सध्या ही रक्कम जुळविण्याचेच लक्ष्य आहे. यातून शिल्लक राहिल्यास आरोग्यावर खर्च करण्यास प्राधान्य दिले जाईल. आर्थिक स्थिती बघूनच विकास कामे केली जातील, असे आयुक्त तुकाराम मुंढे आज म्हणाले. 

उत्पन्न "डाऊन', विकास कामे "लॉक' 
कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या 80 कोटींच्या खर्चासाठीही ओढाताण होताना दिसत आहे. त्यामुळे विकास कामे ठप्प झालीच, शिवाय पथदिव्यांसारख्या पायाभूत सुविधांवरील खर्चाबाबत महापालिका विचारात पडली आहे. 
राज्य सरकारने जीएसटी अनुदानात 43 कोटींची कपात केली असून गेल्या दोन महिन्यांपासून उत्पन्नालाही फटका बसला. राज्य सरकारने केवळ 50 कोटी जीएसटी अनुदान दिले. पुढील काही महिने राज्य सरकारकडून यापेक्षा अधिक जीएसटीची अपेक्षा नाही. त्यातच गेली दोन महिने अनेकांची कामे, दुकाने बंद असल्याने मालमत्ता कर वसुलीही अपेक्षित झाली नाही. 

पालिकेला सध्या निवृत्ती वेतन, वेतन, प्रशासकीय खर्च आदींवर महिन्याला 80 कोटींचा खर्च असल्याचे आयुक्तांनी नुकतेच फेसबुक लाईव्हद्वारे संवादातून स्पष्ट केले. ही रक्कम जुळवतानाही पालिकेच्या नाकी नऊ येत आहेत. त्यामुळे आयुक्तांनी काटकसरीला प्राधान्य दिले असून त्यांनी 56 कंत्राटी अभियंत्यांना कामावरून कमी केले. एवढेच नव्हे ज्यांच्या नियुक्‍त्या अवैध आहे, अशा कर्मचाऱ्यांनाही त्यांनी नोटीस दिले आहेत. आयुक्तांनी यापूर्वीच विकास कामांना ब्रेक लावला आहे. आता पायाभूत सुविधांतही हात आखडता घेत असल्याचे एलएडी पथदिव्यांची फाईल रोखल्यावरून स्पष्ट दिसून येत आहे. परिणामी "स्मार्ट सिटी'तील रस्ते काही दिवसांनी अंधारात राहण्याची चिन्हे आहेत. 

वित्त व लेखा अधिकाऱ्याला कारणे दाखवा 
शहरातील एलईडी पथदिव्यांची फाईल जानेवारी महिन्यापासून लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. याबाबत स्थायी समितीपुढे स्पष्टीकरण देण्यासही टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी वित्त व लेखा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. 

जीव मुठीत घेऊन काम करतात कर्मचारी 
महापालिकेतील कर्मचारी सातव्या वेतन आयोगाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करीत आहेत. याबाबतची फाईल राज्य सरकारकडे आहे. राज्य सरकारने मंजुरी दिली तरी पालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने सातवा वेतन आयोग लांबणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT