राज्य

नोटबंदीने सात लाख कोटींचा कर वाचेल- तावडे

संपत देवगिरे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतल्याने जनता खूष आहे. या निर्णयाने देशातील जनतेचा सात लाख कोटी रुपयांचा कर वाचेल. हे सात लाख कोटी विकास कामांसाठी उपलब्ध होतील. येत्या दोन वर्षात त्याचा खुप मोठा परिणाम दिसून येईल असा दावा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केला. 

नोटबंदीविषयी तज्ञांकडून विविध आक्षेप घेतले जात असतांनाच तावडे यांनी पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारासाठी झालेल्या मेळाव्यात हा दावा केला. यातील सात लाख कोटींची संख्या कशी व कुठुन आली यावरुन भविष्यात नवी चर्चा होण्याची शक्‍यता आहे. "" नोटबंदीने बॅंकात चौदा लाख कोटी रुपये जमा झाले. यातील निम्मे सात लाख कोटी अल्प व्याजाने सरकारी तिजोरीत येतील. त्यामुळे जनतेवर कर लादून सरकार जी तिजोरी भरते, त्यातील सात लाख कोटींचा कर वाचेल. सात लाख कोटी रुपये रस्ते, पूल आदी विकासकामांवर खर्च होतील. येत्या दोन वर्षात त्यातून सबंध देशाचे चित्र पालटलेले आपल्याला पहायला मिळेल.'' असे तावडे यांचे म्हणणे आहे. 

""भाजपाने विरोधी पक्षात असतांना सत्ताधारी पक्षावर टीका केली, जनतेच्या प्रश्‍नांवर आंदोलने केली. सत्तेत आल्यावर सर्व जनहिताचे निर्णय आम्ही घेतले. सिंचन घोटाळ्यावर चितळे आयोग नेमला. पाटबंधारे खात्याच्या वादग्रस्त निविदा रद्द केल्या. दुष्काळावर उपाय म्हणून सिंचनावर भर दिला. दुष्काळाच्या अनुदानाचा निम्मा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला. त्यामुळे केंद्रातील अडीच वर्षांच्या व राज्यातील दोन वर्षांच्या कामकाजावर जनता खूष आहे,'' असेही प्रतिपादन तावडे यांनी केले. 

नोटबंदी अन्‌ सामसूम 
कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तावडे यांनी उपस्थितांना "नोटबंदीने तुम्हाला काही त्रास झाला का?' असा प्रश्‍न विचारला. त्यावर सगळी सामसूम होती. काहीही प्रतिक्रीया आली नाही. मात्र प्रतिक्रियेची वाट न पाहता तावडे म्हणाले, ""थोडा फार त्रास झाला असेल. मात्र, ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांनाच हा त्रास झाला आहे. नाशकात थंडी खुप आहे. ज्यांना त्रास झाला असेल त्यांना म्हणावे, जुन्या नोटा आणा अन्‌ खुशाऽऽल शेकोटी पेटवून शेकत बसा.''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT