Maratha Reservation
Maratha Reservation Sarkarnama
राज्य

मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखाचा निधी अखेर मंजूर

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याच्या आश्वासनाची महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) पूर्तता केली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण 34 कुटुंबियांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे आभार मानले आहेत.

मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना कुटुंबाना 10 लाख रूपये देण्याची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ 15 कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रूपये देण्यात आले होते. मागील सरकारचे हे आश्वासन महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल व या कुटुंबियांना राज्य शासनाकडून प्रत्येकी १० लाख रूपये देण्यात येतील, असा शब्द मुख्यमंत्री ठाकरे आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चव्हाण यांनी मराठा समन्वयकांना दिला होता. त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 कोटी 65 लाख रूपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आला आहे.

आजवर शासनाची मदत न मिळालेल्या 19 वारसांना प्रत्येकी 10 लाख तर, यापूर्वी 5 लाख रूपये मिळालेल्या 15 वारसांना प्रत्येकी आणखी 5 लाख रूपये या निधीतून दिले जातील. शासनाची आर्थिक मदत मिळणाऱ्या 34 कुटुंबियांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 6, जालना 3, बीड 11, उस्मानाबाद 2, नांदेड 2, लातूर 4, पुणे 3, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे. मराठा समाजाच्या मागणीनुसार सदर निधी निर्गमित केल्याबद्दल चव्हाण यांनी मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही आभार मानले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT