Constitution of India
Constitution of India Sarkarnama
राज्य

संविधान बदलण्याची भाषा पडली महागात, पोलिसांनी केला गुन्हा दाखल..

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : सध्या वादग्रस्त वक्तव्यातून राळ उडविण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्याने किर्तनकार बंडातात्या कऱ्हाडकर नुकतेच दुहेरी अडचणीत सापडले आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई, तर केलीच. शिवाय भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या निषेधाचाही त्यांना सामना करावा लागला. या वक्तव्याची धूळ खाली बसतो न बसतो तोच करनी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर (Ajay Singh Sengar) यांनी, तर थेट देशाच्या संविधानालाच (Constitution of India) आव्हान देण्याची भाषा पिंपरी-चिंचवड, चिखली येथे नुकतीच केली. मात्र, ती त्यांच्या अंगलट आली आहे.

राष्ट्र प्रतिष्ठेचा अपमान प्रतिबंधक कायदा,१९७१ च्या कलम २ नुसार त्यांच्याविरुद्ध पनवेल पोलिस ठाणे (जि.रायगड) येथे झिरो झिरोने गुन्हा नोंद करण्यात आला. प्राथमिक तपासात तो पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत घडल्याने नंतर तो इकडे वर्ग करण्यात आला. त्याबाबत प्रभाकर शाबा कांबळे (वय ४७, रा. नवीन पनवेल) यांनी फिर्याद दिली आहे. मात्र, या गुन्ह्यात सात वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यात अटकेची कारवाई न करता पोलिस न्यायालयात थेट दोषारोपपत्रच दाखल करणार आहे. मात्र, तत्पूर्वी सेंगर याला बोलावून नोटीस बजावत समज देण्यात आली असल्याचे चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी 'सरकारनामा'ला आज (ता.4 फेब्रुवारी) सांगितले.

अकबराचा फोटो महापुरुष म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय संविधानात असल्याने संविधानच बदलण्याची गरज असल्याचे सेंगर याने एका यू ट्यूब चॅनेलला मोरेवस्ती, चिखली येथील कार्यक्रमानंतर दिलेल्या मुलाखतीत १९ जानेवारी रोजी सांगितले होते. अकबराचा उदो, उदो करणारे संविधान नको. गांधी व आंबेडकर मार्ग त्याग करून शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या मार्गावरून चालणे फार जरुरी आहे, असे तो म्हणाला होता. संविधानाप्रती अनादर दाखविणारे व बेअदबी करणारे वक्तव्य केल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे. त्यात तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT